सलग सोळा तास अभ्यास करत विद्यार्थ्यांची महामानवास वैचारिक सलामी

0

येवला प्रतिनिधी ;

मी अजिवन विद्यार्थी म्हणून जगण्यात धन्यता मानतो असे अध्ययनाप्रती असलेले आपले प्रेम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच उद्देशाने येथील विद्यार्थ्यांनी सलग सोळा तास अभ्यास करत महामानवास वैचारिक सलामी दिली . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड मेहनतीच्या तसेच ज्ञानार्जनाच्या उर्मीने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची जाणीव निर्माण करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून अनुभव शिक्षण प्रशिक्षण सामाजिक संशोधन बहुउद्देशीय संस्था व सलग अठरा तास अभ्यास उपक्रम समिती येवला येथे दरवर्षी सोळा तास अभ्यास उपक्रम राबवीत असते.

हे या वर्षीचे संस्थेचे  दशकपूर्ती वर्ष आहे. या ही वर्षी समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह येवला येथील महात्मा फुले नगर येथील  विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. महापुरुषांच्या जीवन संघर्षामुळेच आज आपण सुखाची भाकरी खात आहोत,हि जाणीव ठेवून आम्ही विद्यार्थी वर्गामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी काम करीत असल्याचे या उपक्रमाचे आयोजक व संस्थेचे प्रमुख संयोजक हिरामण मेश्राम यांनी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जिवनात अठरा अठरा तास अभ्यास करीत आयुष्यभर ज्ञानसाधना केली. आणि हे ज्ञान राष्ट्रहितासाठी खर्च केले. याच विचारांची कास आजच्या विद्यार्थ्यांनी धरावी हि संस्थेला असलेल्यांचे मेश्राम यांनी सांगितले. आमचा उपक्रम खुले व्यासपीठ असून हा कृतिशील उपक्रम कुणीही कुठेही राबवू शकतो. या उपक्रमाचा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाप्रती जागृती निर्माण करणे एवढाच असल्याचे त्यांनी सांगितले. समारोपाच्या अध्यक्षस्थानी विकास वाहूळ हे होते. त्यांनीहि आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा गौरव केला. तसेच असे अभिवादन हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सकाळच्या सत्रात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन उपक्रमास सुरुवात करण्यात आली.

संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता तसेच दुपारी व संध्याकाळी जेवण देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती महात्मा फुले नगर,येवला येथील पदाधिकारी व विद्यार्थी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विनोद त्रिभुवन, नितीन संसारे, प्रविन खंडागळे लिना मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. समारोपाच्या सत्राचे प्रास्तविक व सुत्रसंचलन नितीन संसारे यांनी केले. भोजन निर्मितीसाठी वर्षा गायकवाड तेजस्विनी यादव मनिषा टोंगारे सुमन माहुलकर किशोर माहुलकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी रुपाली खंडागळे संगिता वाहुळ शिलाबाई खंडागळे वैशाली आहिरे आदींसह मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here