पाच राज्याचे एक्झिट पोल ;कॉंग्रेसची मोठी मुसंडी

0

अहमदनगर : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांसाठीचं मतदान पूर्ण झालं असून 3 डिसेंबरला या पाचही राज्यांचा निकाल हाती येईल.मात्र, त्याआधी कोणत्या राज्यात कोणाची सरशी होणार, कोण सत्ता टिकवणार तर कुठे सत्तापालट होणार याचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल प्रसिद्ध होत आहेत. यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत पाचपैकी तीन राज्यामध्ये सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहेत तर राजस्थानमध्ये संमिश्र अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत .

छत्तीसगढ

छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. इथे 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान झालं होतं.

  • इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला छत्तीसगढमध्ये 40 ते 50 जागा जिंकता येतील, तर भाजप 36 ते 46 जागांवर विजय मिळवू शकेल.
  • एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार छत्तीसगढमध्ये काँग्रेसला 57, तर भाजपला 33 जागा मिळतील.
  • रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेमध्ये छत्तीसगढमध्ये 44-52 जागा काँग्रेस जिंकू शकेल, तर भाजप 33 ते 42 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • टाइम्स नाऊने आपल्या एक्झिट पोलमध्ये 48-56 जागांवर काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे, तर 32 ते 40 जागांवर भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे.
  • न्यूज24- चाणक्यचा एक्झिट पोल काँग्रेसला 57 जागा देत आहे, तर 33 जागा भाजपाला मिळतील असा अंदाज आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेससाठी छत्तीसगढचा विजय हा तितका सोपा नसल्याचं चित्र या आकड्यांतून स्पष्ट होत आहे.

एकूणच या सर्व्हेनुसार छत्तीसगढमध्ये दोन्ही पक्षांत चुरशीची लढत असेल.

राजस्थान

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागा आहेत. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला इथे 86 ते 106 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 जागा मिळाल्या होत्या. अशोक गहलोत हे मुख्यमंत्री झाले होते, तर भाजपला 70 जागांवर विजय मिळाला होता.

  • भाजपला राजस्थानमध्ये 80 ते 100 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 9-18 जागांवर अन्य पक्ष, अपक्ष विजयी होऊ शकतात.
  • राजस्थानमध्ये टाइम्स नाऊच्या पोलनुसार काँग्रेसला 56 ते 72 जागा मिळतील, तर भाजपला 108 ते 128 जागा मिळतील.
  • इंडिया टुडे- एक्सिसच्या एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला 86-106 जागा मिळताना दिसत आहे, तर भाजपला 80-100 जागांचा अंदाज आहे.
  • एबीपी आणि सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला 71 ते 91 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर भाजपला 94-114 जागांचा अंदाज आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमध्ये भाजप पुन्हा सत्ता राखणार का हा कळीचा प्रश्न आहे. कारण निवडणुकीच्या आधी भाजपने घेतलेले अनेक मोठे निर्णय. अगदी खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात त्यांनी उतरवलं.

  • न्यूज 24-चाणक्यच्या सर्व्हेनुसार भाजपला या निर्णयांचा फायदा होताना दिसतोय. या एक्झिट पोलमध्ये भाजपला 139-163 जागा मिळताना दिसत आहेत, तर काँग्रेसला 62-89.
  • मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी 116 जागा आवश्यक आहेत. न्यूज 24-चाणक्यच्या एक्झिटपोलनुसार भाजप बहुमताचा हा आकडा ओलांडत आहे.
  • रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्येही मध्य प्रदेशमध्ये भाजप बहुमताचा आकडा ओलांडताना दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपला 118 ते 130 जागा मिळतील. काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये 97-107 जागा मिळतील.
  • टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपला 105-117 जागा मिळताना दिसत आहे, तर काँग्रेसला 109-125 जागा दिसत आहेत.
  • इंडिया टुडे आणि अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 140 ते 162 जागा मिळताना दिसत आहेत, तर भाजपला 68-90 जागा मिळताना दिसत आहेत.

तेलंगणा

तेलंगणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहेत. सत्तास्थापनेसाठी 60 जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.

आता के चंद्रशेखर राव तिस-यांदा तेलंगणात बहुमत मिळवणार की त्यांच्या लोकप्रियतेला धक्का देणारा काँग्रेसचा रेवंथ रेड्डी हा तरुण चेहरा काही चमत्कार मिळवणार हा प्रश्न आहे.

  • न्यूज 24-चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला (भारत राष्ट्र समिती) 24-42 जागा मिळतील, तर काँग्रेसला 62-80 जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपला इथे केवळ 2 ते 12 जागा मिळतील.
  • टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार बीआरएसला 37 ते 45 जागांवर विजय मिळेल, तर काँग्रेस 60-70 जागा जिंकू शकेल.
  • एबीपी-सी व्होटरच्या सर्व्हेत बीआरएसला 38-54 जागा मिळतील, तर काँग्रेसला 49-65 आणि भाजपला 5 ते 13.
  • रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये बीआरएस 46 ते 56 जागांवर विजयी होताना दिसत आहे, तर काँग्रेस 58-68. भाजपला केवळ 4-9 जागा मिळत आहेत

मिझोरम

मिझोरममध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. विजयासाठी 21 जागा जिंकणं आवश्यक आहे.

  • एबीपी सीव्होटरच्या सर्व्हेनुसार मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला 15-21 जागा मिळत आहेत, तर झोरम पीपल्स मुव्हमेंटला 12-18 जागा मिळत आहेत. काँग्रेसला केवळ 2 ते 8 जागांवर समाधान मानावं लागेल.
  • इंडिया टुडे-अक्सिसचा एक्झिट पोल मात्र झोरम पीपल्स मुव्हमेंटला 28-35 जागा दाखवत आहे, तर मिझो नॅशनल फ्रंटला केवळ 3-7. या सर्व्हेनुसार काँग्रेसला 2-4 जागा मिळतील.
  • रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार मिझो नॅशनल फ्रंटला 17-22 जागा मिळत आहेत, तर झोरम पीपल्स मुव्हमेंटला 7-10 आणि काँग्रेसला 1-2 जागा मिळताना दिसत आहेत.
  • टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये मिझो नॅशनल फ्रंटला 15-21 जागा मिळाल्या आहेत. झोरम पीपल्स मुव्हमेंटला 12-18 आणि काँग्रेसला 2-8 जागा मिळताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here