गावागावात संविधान पारायणे झाली पाहिजेत.तरच लोकशाही बळकट होईल- प्रा विक्रम कदम

0

सातारा/अनिल वीर : काल्पनिक पोथ्या पुराणं यांची पारायणे करण्यापेक्षा गावागावात भारतीय संविधानाची पारायणे झाली पाहिजेत.तरच खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल.असे प्रतिपादन प्रा.विक्रम कदम यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती विंग,ता,कराड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात, ‘भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्य’ या विषयावर कदम मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी किशोर जाधव होते.

            प्रा.विक्रम कदम म्हणाले, “भारतासारख्या खंडप्राय देशाला एकत्र बांधून ठेवणारा मूलभूत घटक म्हणजे भारताचे संविधान आहे.या देशाच्या संविधान निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेतली होती.अहोरात्र कष्ट करून त्यांनी भारताला प्रबळ लोकशाही राष्ट्र बनवण्यासाठी परिपूर्ण अशा संविधानाचा भक्कम पाया उपलब्ध करून दिला.त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुस्तकावर जीवापाड प्रेम केले. सतत वाचन लेखन  संशोधन करून इथल्या शुद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या अनेक जातीधर्माच्या लोकांना त्यांनी माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली.आज आपण आपल्याला संविधानाने दिलेल्या हक्काधिकारांचा वापर करून विकसित होताना आपण आपली जबाबदाऱ्या ओळखूनही वर्तन केले पाहिजे.वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून अंधश्रद्धा व कर्मकांड यात न अडकता आपण वाटचाल केली पाहिजे.”

    यावेळी मानव ढोणे,विनायक सोनावले व अरुण सोनवले यांनीही मनोगतं व्यक्त केली. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. याकामी अध्यक्ष स्वप्नील सोनवले, उपाध्यक्ष अब्लिश सोनवले, विशाल सोनवले व सर्व कार्यकर्त्यांनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here