शरद पवार-शेखर गोरे भेट, सकारात्मक चर्चा

0

विजय ढालपे,गोंदवले : माढा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय गाठीभेटी वाढल्या असून, उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. आता पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यातील बैठकीत गोरे यांच्या मागण्यांबाबत विचार करण्यात येणार आहे. त्यानंतरच गोरे निर्णय जाहीर करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. उमेदवार राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पाठिंब्याबाबत चाचपणी करत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी आठ दिवसांपूर्वीच शेखर गोरे यांची भेट घेतली होती, तर दोन दिवसांपूर्वी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनीही गोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यातच गोरे महाविकास आघाडीत असले तरी माणच्या राजकारणात त्यांच्यापुढे अडचणी उभ्या केल्या जात आहेत. राष्ट्रवादीबद्दल त्यांच्यापुढे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय प्रचारात उतरणार नाही, असे त्यांनीच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
सोमवारी रात्री पवार आणि गोरे यांच्यात सुमारे एक तासभर चर्चा झाली. यामध्ये माढा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणे, ताकद देणे, याविषयी चर्चा झाली. तसेच माण तालुक्याच्या राजकारणावरही भाष्य झाले. ही चर्चा सकारात्मक झाली तरी माणमधील प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लोकसभा प्रचाराचा निर्णय घेणार नाही, असे गोरे यांनी ठरविले आहे.
बारामती येथे शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. यामध्ये पाठीमागील काही विषय होते. या भेटीत माझे म्हणणे मांडले आहे. भेटीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तरीही मुंबईत शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक होईल. त्यातून आणखी मार्ग निघेल. त्यानंतर प्रचाराचा निर्णय घेऊ.
– शेखर गोरे, जिल्हा संपर्कप्रमुख उध्दवसेना 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here