कुडाळ परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

0

पाचगणी : कुडाळसह परिसरात गावांमध्ये आज दुपारी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. तर आंबे व शेतामधील ज्वारीला या पावासचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
तापमानात वाढ होत असून उष्म्याच्या त्रासामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल होत होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने तगमग वाढली असतानाच विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला.
कुडाळ परिसरात बुधवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. कुडाळ, सरताळे, सोनगाव, हुमगाव, करहर, म्हसवे या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस झाला.
दुपारी रणरणत्या उन्हाच्या वेळी पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. काही युवकांनी या पावसात भिजण्याचा आनंदही लुटला. मात्र, पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे शेतातील आंबा फळबागांचे नुकसान झाले.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडलेली दिसून आली. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून अजूनही ज्वारी काढणी सुरू आहे. त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका ज्वारी पिकाला तसेच फळझाडांना बसणार असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे.
पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. रस्त्यांवर पाण्याचा लोंढा वाहत होता. परिसरात पाऊस झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन शेतातील कामे पूर्ण करावीत, तसेच अचानकपणे विजेचा कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली तर सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here