शाहूपुरीत नळांना येतेय गढूळ, पिवळसर पाणी

0

शाहूपुरी : शाहूपुरी व परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारा पाणी पुरवठा हा गढूळ होत आहे. त्याचबरोबर पाण्याला पिवळसर रंग दिसून येत असून भांड्याच्या तळाशी माती, शेवाळ दिसून येत आहे. या पाण्यामुळे काही कुटुंबातील वृध्द व लहान मुलांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. याबाबत जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले यांनी केली आहे.

याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शाहूपुरी परिसराला कण्हेर स्रोतातून जो पाणी पुरवठा होत आहे त्याचा रंग पिवळसर येत आहे. भांड्यांच्या तळाशी माती, शेवाळ वजा घाण जमा होत आहे.काही कुटुंबांमध्ये वृध्द व लहान मुलांना गॅस्ट्रोची लागण झालेली आहे.

हा प्रकार मागेही घडला होता.त्यावेळी तक्रारीनंतर पाण्याच्या टाक्या, फिल्टर टॅंक पूर्णपणे स्वच्छ करुन पाणीपुरवठा केल्यावर पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू झाला होता. यावेळीही आपल्या विभागामार्फत याप्रश्नी त्वरीत योग्य ती उपाययोजना करावी,अशी मागणी भारत भोसले यांनी केली आहे.

शाहूपुरी – जुना मेढा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम कण्हेर पाईप लाईन शिफ्टिंगचे काम रखडल्याने थांबले आहे. हा महत्वाचा रहदारीचा रस्ता असून पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी न लागल्यास नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. याप्रश्नी आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.

परंतु,नुसते फोन,पत्रे देऊन नागरिकांना दिलासा मिळणार नाही यासाठी ठोस कृतीची आवश्यकता आहे. हा प्रश्न समन्वयाने त्वरीत मार्गी लावावा. पुलाचे बांधकामातील अडथळा दूर करण्यासाठी कण्हेर पाईप लाईन शिफ्टिंगचे काम मार्गी लावून सहकार्य करावे, अशी मागणी भारत भोसले यांनी केली आहे.

शाहूपुरी व परिसरात कण्हेर पाणी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी गढूळ येणे, पाण्याचा कलर पिवळसर असणे, शेवाळ वजा घाण पाण्यातून येणे अशा तक्रारी परिसरातील नागरिकांकडून येत आहेत. याबाबत प्राधिकरणाकडे तक्रार केली असून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्राधिकरणाने पावले उचलावीत. -भारत भोसले (शाहूपुरी ग्रामविकास आघाडी) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here