सातारा जिल्ह्यात १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

0

सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाई भीषण होऊ लागल्याने प्रशासनास टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात दोन लाख ९४ हजार ४४५ लोकांना १७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यात उष्णता वाढल्याने पिण्याच्या पाण्याची अवस्था वाईट होत आहे. जिल्ह्यात तब्बल आठ तालुक्यांत १७८ गावे व ६०३ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ४९ हजार ४४५ लोकांना १७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात टंचाईच्या झळा सर्वाधिक माण तालुक्यात बसत आहेत. एकट्या माण तालुक्यात ८३ टँकरद्वारे ६५ गावे व ४०१ वाड्यावस्त्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक विहिरी, बोअरवेल आटल्या असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांचेही नुकसान होणार आहे.
माण पाठोपाठ खटाव तालुक्यात टंचाईच्या झळा बसत आहे. खटाव तालुक्यात ३४ टँकरद्वारे ४४ गावे व १०७ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात २४ टँकरद्वारे ३४ व ८८ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यात २३ टँकरद्वारे २६ गावांत पाणीपुरवठा केला जात आहे.
पाटण तालुक्यात चार टँकरद्वारे एक गाव व चार वाड्यावस्त्यांवर, वाई तालुक्यात चार टँकरद्वारे तीन गाव व तीन वाड्यावस्त्यांवर, खंडाळा तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावात, कऱ्हाड तालुक्यात दोन गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. राज्यात परतीचा पाऊसही झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत निर्माण होणारी परिस्थिती जानेवारीमध्ये दिसून येत आहे. या स्थितीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होऊ लागले आहे.

विहीर, बोअरवेलचे अधिग्रहण

जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ होत असल्याने विहीर व बोअरवेलचे अधिग्रहणात वाढ केली जात आहे. संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५० विहिरीचे व ४२ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here