संगमनेर : समाजामध्ये होणारे महिला आणि बालकांवरील अन्याय, अत्याचार तसेच बालविवाह सारख्या चुकीच्या प्रथावर प्रतिबंध आणणे ही समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन व सर्व समाज घटकांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी केले.
संगमनेर तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व मुख्य प्रशासकीय विभागांच्या प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर व राजेश पऊल, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ,तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री.गोडेॅ, रंजना गवांदे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, अक्षय तृतीयेचा मुहूर्त आणि मे महिन्याच्या सुट्ट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढते.त्यामुळे सर्वच प्रशासकीय विभागांनी सतर्क राहून गाव पातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन करून प्रतिबंधात्मक काम करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्वच यंत्रणा सकारात्मक भूमिका यापुढील काळात बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी असलेल्या हेल्पलाइन नंबरवर मदत मिळू शकते असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या हेल्पलाइन संबंधित सर्व माहिती प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत मध्ये लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी लोकपंचायत, जय हिंद लोक चळवळ, एकविरा फाउंडेशन आदी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी बरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.