लाच स्वीकारणारा दलाल आणि तलाठी नाशिक एसीबीच्या कारवाईत चतुर्भुज

0

संगमनेर : अकरा जणांच्या नावावर असलेल्या जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे नोंदविण्यासाठी ३६ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या खाजगी दलालाला नाशिकच्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर ज्या तलाठ्यासाठी ही लाच स्वीकारली गेली त्या तलाठ्यालाही चतुर्भुज करण्यात नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश आले असून या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

         तालुक्यातील मंगळापुर शिवारात बिगर शेती जमीन असणाऱ्या तक्रारदाराने आपल्या वडिलांसह अन्य ११ जणांच्या नावावर असलेल्या या जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे नोंदविण्यासाठी चिखली गावचे कामगार तलाठी धनराज नरसिंग राठोड (वय ४०) रा. इंदिरानगर, गल्ली नंबर १, याच्याशी संपर्क साधला होता. यावेळी तलाठी राठोड याने हे काम करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीआंती शुक्रवारी ३६ हजार रुपये देण्यावर त्यांच्यात एकमत झाले. तत्पूर्वीच तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक अजय गरुड, आणि चालक विनोद पवार यांनी संगमनेर येथे येऊन तक्रारदारास  तलाठी धनराज राठोड याच्याशी संपर्क साधण्यास सांगितला. यावेळी तलाठी राठोड याने लाचेची रक्कम घुलेवाडी येथील सह्याद्री मल्टी सर्विसेसचा चालक व तलाठी धनराज राठोड याचा खाजगी दलाल योगेश विठ्ठल काशीद (वय ३३) रा. घुलेवाडी फाटा याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचत ठरल्याप्रमाणे तक्रारदाराच्या हातात विशिष्ट पावडर लावलेल्या नोटा दिल्या व त्या संबंधित दलालाकडे पाठवले. सदर दलाल लाचेची रक्कम स्वीकारत असताना वेशांतर करून दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता योगेश काशीद या दलालाला रंगेहात पकडले.सदर रक्कम आपण तलाठी धनराज राठोड याच्यासाठी घेतल्याची कबुली त्याने या पथकाला दिली. त्यानंतर काही वेळातच संगमनेर पोलिसांच्या मदतीने लाचखोर तलाठी धनराज राठोड याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. या दोघांवरही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणामुळे संगमनेरात महसूल विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here