तालुक्याच्या हिताच्या व विकासाच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवा- आ.बाळासाहेब थोरात
संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने अत्यंत चांगले काम केले असून विविध ठिकाणी उपबाजार सुरू केले आहेत. आगामी काळात संगमनेरात मोठे डाळिंब व कांदा मार्केट होणार असून बाजार समितीची ही निवडणूक काही लोकांनी विनाकारण लादली आहे. तिकडचे दहशतीचे व चुकीचे वातावरण आपल्या तालुक्यात येऊ द्यायचे नसून तालुक्याच्या हिताच्या व विकासाच्या आड येणाऱ्यांना या निवडणुकीतून धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील चंदनापुरी येथे शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ व मतदार मेळाव्यात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे ,सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,रणजीतसिंह देशमुख, लहानुभाऊ पा. गुंजाळ, आर बी राहणे, इंद्रजीत थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी ,संजय फड,बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे ,महेंद्र गोडगे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, शंकर खेमनर, गणपतराव सांगळे, सुधाकर जोशी, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी असून अनेक दिवस काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळाली आहे. संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था व बाजार समिती ही राज्यात अग्रगण्य आहे. येथील चांगले वातावरण, विकासाची वाटचाल यामुळे तालुक्याचा सर्वत्र लौकिक होतो आहे. मात्र हे काही लोकांना पहावत नाही. त्यामुळे येथील सहकारी संस्था मोडीत काढण्यासाठी ते अडथळे निर्माण करत आहेत.राज्यात सर्वाधिक काळ महसूल मंत्री पद भूषवताना आपण सर्वसामान्य जनतेची कामे केली. जास्तीत जास्त विकासाच्या योजना राबवल्या. कधीही कुणाचे वाईट केले नाही. सुसंस्कृत राजकारण ही आपली परंपरा असून विकासात कधीही भेदभाव केला नाही.तालुक्यातील निमगाव जाळी ,कोल्हेवाडी यांसह सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी आपण मोठा निधी मिळवला. मात्र ज्यांचा काही संबंध नाही ते विद्यमान सरकारमधील मंत्री मागील योजनांच्या निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रही आहेत.निळवंडेच्या कालव्यांचे काम आपल्या काळात रात्रंदिवस सुरू होते. ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी द्यायचे होते मात्र सरकार बदलल्याने सध्या डाव्या कालव्याचे काम अत्यंत मंदावले आहे.तर उजव्या कालव्याचे काम सध्या बंदच आहे.काही खबरे चुकीच्या माहिती त्यांना देत असून दबाव टाकून विविध कार्यकर्त्यांवर खोट्या-नाट्या केसेस दाखल करून दहशतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत .हे दहशतीचे व चुकीचे वातावरण आपल्याला इकडे येऊ द्यायचे नाही.राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण असून बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत तालुक्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मंत्री बबनराव घोलप म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील ही बाजार समिती राज्यासाठी आदर्शवत आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. राहाता तालुक्यामधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठे यश मिळणार असून संगमनेर तालुक्यातील विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन त्यांनी केले.आ.सत्यजित तांबे म्हणाले की ,संगमनेरचा सहकार हा राज्यात आदर्शवत असून विरोधकांनी विनाकारण ही निवडणूक लादली आहे. या निवडणुकीत त्यांना चांगला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले तर माजी.आ.डॉ सुुुुधीर तांबे म्हणाले की, संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल असून चांगल्या कामात खोडा घालण्याचे राजकारण काही मंडळी करू पाहत आहे. मात्र संगमनेर मध्ये त्यांचा डाव यशस्वी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेरच्या सर्व सहकारी संस्थांना चांगल्या कामाची मोठी परंपरा असून या निवडणुकीतही सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.यावेळी सुरेश कान्होरे, सतीश खताळ, गीताराम गायकवाड, मनीष गोपाळे, कैलास पानसरे, विजय सातपुते, सौ दिपाली वर्पे ,सौ रुक्मिणी साकुरे ,सुधाकर ताजने ,अनिल घुगे, अरुण वाघ , सखाराम शरमाळे, मनसुख भंडारी, महेंद्र गुंजाळ, संजय खरात ,निलेश कडलग, निसार शेख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर खेमनर यांनी केले, सूत्रसंचालन मिलिंद कानवडे व नामदेव कहांडळ यांनी तर बाबा ओहोळ यांनी आभार मानले.
चौकट :- खबऱ्यांचा बंदोबस्त मतदार करतील
स्वतःच्या फायद्यासाठी अनेक खबरे संगमनेर तालुक्यात काम करत असून या निवडणुकीमध्ये सर्व खबऱ्यांचा बंदोबस्त तालुक्यातील मतदार करतील असा विश्वास आमदार थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.