गायत्री व अश्विनी घारे यांच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम -स्नेहलताताई कोल्हे

0

शहापूर येथील गायत्री घारे व अश्विनी घारे यांची पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल स्नेहलताताई  कोल्हे यांच्या हस्ते सत्कार 

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील शहापूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गायत्री बाबासाहेब घारे आणि अश्विनी बाबासाहेब घारे या भगिनींनी कठोर परिश्रम घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुलींमध्येही गुणवत्ता व टॅलेंट आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या जिद्दीला व मेहनतीला आमचा सलाम आहे. गायत्री व अश्विनी घारे यांची पोलिस कॉन्स्टेबलपदी झालेली निवड कोपरगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद असून, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी काढले.

कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील कु. गायत्री बाबासाहेब घारे व कु. अश्विनी बाबासाहेब घारे यांची पुणे शहर पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

कु. गायत्री घारे आणि कु. अश्विनी घारे या दोघी शहापूर (ता. कोपरगाव) येथील शेतकरी बाबासाहेब घारे यांच्या कन्या असून, त्यांची पुणे शहर पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झाली आहे.   या दोघीही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. गायत्री घारे व अश्विनी घारे या दोघींनी पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि जिद्द व कठोर परिश्रमाच्या बळावर हे स्वप्न साकार केले. या दोघींच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या आई-वडिलांनीही मोलाची साथ दिली. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचाही मोलाचा वाटा आहे. गायत्री घारे व अश्विनी घारे या दोन्ही भगिनींनी जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर व अडीअडचणीवर मात करत हे नेत्रदीपक यश मिळवून कोपरगाव तालुक्याचा लौकिक वाढविला आहे. या दोघी बहिणींनी मिळविलेले यश नजरेत भरण्यासारखे असून, कोपरगाव तालुक्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे यांनी गायत्री घारे व अश्विनी घारे यांचे  मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. अशा काळात ग्रामीण भागातील मुला-मुलींनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवून प्रयत्न करावेत. शिक्षणामुळे समाजाची प्रगती होते. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन युवकांनी शिक्षण घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराच्या वतीने नेहमीच मदत केली जाते. यापुढील काळातही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतीही परीक्षा अवघड नाही. विद्यार्थ्यांनी कुठलाही नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. जिद्द न सोडता,शेवटपर्यंत प्रयत्न करा, यश नक्कीच प्राप्त होईल, असा मोलाचा मंत्र स्नेहलताताई कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला. 

याप्रसंगी पोहेगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन औताडे, नितीन पाचोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, प्रवीण घारे, भाऊसाहेब घारे, अमोल घारे, दत्तात्रय पाचोरे, सागर घारे, सतीश घारे, वसंत घारे, अप्पासाहेब घारे, अविनाश घारे, समाधान डांगे, अभिजीत पाचोरे, गणेश खंडीझोड, अण्णासाहेब खंडीझोड, शरद पाचोरे, रवींद्र घारे, राहुल घारे आदी उपस्थित होते. दरम्यान, बहादराबाद (ता.कोपरगाव) येथील राजेंद्र चांगदेव पाचोरे यांची कन्या कु.प्रतीक्षा राजेंद्र पाचोरे हिची पिंपरी चिंचवड पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड स्नेहलताताई कोल्हे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here