कौठे धांदरफळ येथे जेसीबी आणि ट्रॅक्टर सह २६ लाखाचे साहित्य जप्त
संगमनेर : जेसीबीच्या साह्याने अवैद्यरित्या मुरुमाचे उत्खनन करताना आढळून आल्याने संगमनेरच्या महसूल विभागाच्या पथकाने जेसीबी आणि ट्रॅक्टर सह सुमारे २६ लाखाचे साहित्य जप्त केले. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे ही धडक कारवाई करण्यात आली.
दोनच दिवसांपूर्वी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्या पथकाने शहरा नजीकच्या खांडगाव येथे प्रवरा नदी पात्रात छापा टाकत वीस लाखाच्या जेसीबी सह १५ ब्रास वाळू साठा जप्त केला होता. त्या नंतर दुसऱ्याच दिवशी तालुक्यातील कौठे धांदरफळ शिवारात अवैद्य मुरूम उत्खनन करणाऱ्या मुरूम तस्कराच्या मुस्क्या संगमनेरच्या महसूल विभागाने आवळल्या आहेत. कौठे धांदरफळ परिसरात राजू घुले हा जेसीबीच्या साह्याने अवैद्यरित्या मुरमाचे उत्खनन करून ट्रॅक्टर ट्रॉली मधून वाहतूक करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत संगमनेरचे प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर यांना समजली होती. त्यानुसार प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, तलाठी युवराज जारवाल, श्री.गडदे, श्री.चिंचोलीकर आदींचे पथक मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कौठे धांदरफळ शिवारात पोहोचले. त्यावेळी या पथकाला जेसीबीच्या साह्याने मुरमाचे उत्खनन होताना आढळून आले तसेच या ठिकाणी मुरमाची वाहतूक करण्यासाठी असलेला ट्रॅक्टर आढळून आला. त्यामुळे या पथकाने जेसीबी सह ट्रॅक्टर ताब्यात घेत सुमारे २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खांडगाव नंतर कौठे धांदरफळ मध्ये महसूल विभागाची धडक कारवाई झाल्याने अवैद्यरित्या वाळू व मुरूम उत्खनन करणाऱ्या मध्ये धडकी भरली आहे. दरम्यान तालुक्यात डोंगराच्या कडेला असणाऱ्या अनेक गावांमधून अशाच पद्धतीची मुरुमाची तस्करी अनेक दिवसापासून सुरू आहे या मुरूम माफियांच्या मुस्क्या आवळण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.