महसूल मंत्री विखे पाटलांना कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेकडून निवेदन
कोपरगाव (वार्ताहर) राज्य सरकारच्या विविध कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात सरकारने मानधनात वाढ केली असून कोतवाल अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढवून तसेच वयोमर्यादा ही वाढवली आहे. याच प्रमाणे पोलीस पाटील यांचेही मानधनात वाढ करून त्यांना वीस हजार रुपये मानधन करावे अशी मागणी पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य व कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
राहाता येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शिवाजी कोलते, कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेचे सदस्य दगु गुडघे ,पंडित पवार, बाबासाहेब गायकवाड, जोशी पाटील,गोरे पाटील आदींनी दिले आहे.पोलीस पाटलांची कार्यकाळ 65 वर्षापर्यंत वाढवावा, किमान वीस हजार रुपये मानधन करावे, 1967 च्या कायद्यात बदल करावा , पेंशन योजना सुरू करावी व रिक्त असलेल्या जागेवर पोलीस पाटलांची पदे भरावीत अशा प्रमुख मागण्या या निवेदनावर घेण्यात आल्या होत्या.पोलीस पाटील हे मानाचे पद असून 24 तास महसूल व पोलीस यंत्रणाला हे मदत करत असतात. या पदाचा ही राज्य शासनाने सारासार विचार करून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे पोलीस पाटील दगू गुडघे यांनी सांगितले.बुधवारी 24 मे रोजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोलीस पाटील संघटनेतील पदाधिकाऱ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले. लवकरच पोलीस पाटलांच्या मागण्या देखील मंजूर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.