प्रशासनाचा आदेश धाब्यावर
सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ ग्रामस्थांवर आली.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ गावात हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे, तहसीलदारांनी रस्ता अडवू नये, असा स्पष्ट आदेश दिलेला असतानाही कायद्याला न जुमानता हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
खर्शी गावातील एका वृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेण्यात येत होते. मात्र, स्मशानभूमीकडे जाणारा एकमेव रस्ता एका स्थानिक शेतकऱ्याने अडवून ठेवला होता. ग्रामस्थांनी विनवणी करूनही संबंधित शेतकऱ्याने रस्ता मोकळा करण्यास नकार दिला. वाद वाढत गेला आणि वेळ निघून जात होती. अखेर, कोणताही पर्याय न उरल्याने हतबल झालेल्या ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी जड अंतःकरणाने त्या वृद्धेच्या पार्थिवावर रस्त्यावरच अग्नी दिला.
प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली
हा रस्ता वाद अनेक दिवसांपासून सुरू असून, हे प्रकरण तहसील न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यापूर्वीही याच रस्त्यावर माजी सैनिक कै. दिनकर साळुंखे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. त्यावेळी प्रशासनाने याची गंभीर दखल घेत, जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कोणीही रस्ता अडवू नये, अशी स्पष्ट ताकीद संबंधित शेतकऱ्याला दिली होती. मात्र, त्या आदेशाला केराची टोपली दाखवत या शेतकऱ्याने पुन्हा एकदा आडमुठेपणा केल्याने ग्रामस्थांना हा धक्का सहन करावा लागला.
समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढा; ग्रामस्थांकडून मागणी
एका व्यक्तीच्या हट्टापायी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे मृत्यूनंतरही होणारी ही अवहेलना कधी थांबणार? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.