जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. सायगाव येथे रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात पाणी साठत आहे.
यामुळे वाहने खड्ड्यांत आदळत असल्याने प्रवास जिकिरीचा झाला आहे. दुरुस्तीचे काम झाले खरे, पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मागमूस दिसेना, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदारसंघातील हा रस्ता त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात दुरुस्त झाला होता. यामुळे ग्रामीण जनतेचा प्रवास सुखकर झाला होता, पण ही सुविधा अल्पकाळच टिकली. सायगाव येथील रस्त्याची दयनीय अवस्था पाहता ग्रामस्थांनी आता थेट मंत्र्यांना हस्तक्षेपाची मागणी केली आहे.”महाराजसाहेब, ही हेळसांड आता थांबवा,” अशी आर्जव त्यांच्याकडून होत आहे.
अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची वाताहत
ग्रामस्थांच्या मते, ठेकेदाराच्या अवजड वाहनांची सततची वर्दळ हेच रस्त्याच्या खराब होण्याचे प्रमुख कारण आहे. यामुळे रस्त्याची वारंवार वाट लागत आहे. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, एकतर रस्ता अवजड वाहतुकीसाठी योग्य बनवावा, नाहीतर ही वाहतूक बंद करावी. तसे न झाल्यास अवजड वाहने पेटवून देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिकांचा रोष वाढत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.