सातार्‍यात बोगस तणनाशकाचा साठा जप्त

0

सातारा : शाहूपुरी पोलिसांनी बोगस तणनाशकप्रकरणी सातारा शहरासह जिल्ह्यातील रेवडी, वडूज, फलटण येथे छापे टाकून शेतीसाठी वापरले जात असलेल्या बोगस तणनाशकाचा साठा जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल साडेबारा लाखांचा आहे.
याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

धैर्यशील अनिल घाडगे (वय 31, शाहूपुरी, सातारा), युवराज लक्ष्मण मोरे (वय 28, रा. रेवडी, ता. कोरेगाव), गणेश मधुकर कोलवडकर (वय 30, रा. धालवडी, ता. फलटण), नीलेश भगवान खरात (वय 38, रा. जाधववाडी, ता. फलटण), तेजस बाळासो ठोंबरे (वय 30, रा. वडूज, ता. खटाव), संतोष जालिंदर माने (वय 45, रा. नडवळ, ता. खटाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा शहरामधील करंजे नाका येथे शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी काही लोक चारचाकी वाहनातून येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजली. बनावट औषधांची खात्री करण्यासाठी एका खत कंपनीच्या मॅनेजरला पोलिसांनी बोलवले. दि. 8 जुलै रोजी दुपारी करंजे नाका येथे संबंधित वाहन आले. पोलिस पथकाने त्या वाहनचालकाला अडवल्यानंतर संशयिताने त्याचे नाव धैर्यशील घाडगे असे सांगितले. टेम्पो क्रमांक एमएच 11 बीएल 0173 यामध्ये शेतीसाठीची लागणारी औषधे असल्याचे त्याने सांगितले. या साठ्याचा संशय आल्याने पोलिस पथकाने औषध तपासले. त्यावेळी संबंधित औषधे ही बायर कंपनीचे राऊन्डअप असे नाव वापरुन बनावट औषधे असल्याचे लक्षात आले. यामुळे पोलिसांनी संबंधित वाहन जप्त करुन चालकाला ताब्यात घेतले. या वाहनामध्ये 2 लाख रुपये किंमतीचा शेतीसाठीची एकूण 260 बॉटल बनावट औषधे होती.

शाहूपुरी पोलिसांनी कॉपी राईट कायदा, ट्रेड मार्क कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने इतर 5 जणांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी एकूण 6 संशयित आरोपींना अटक केली. त्या संशयितांकडून सातारा जिल्ह्यातील, रेवडी ता. कोरेगाव, फलटण, वडूज कारखान्यातून एकूण साडेबारा लाख रुपयांचे बायर कंपनीचे बनावट राऊन्डअप औषधे व चारचाकी वाहन जप्त केले. पोनि सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी ढेरे, ढमाळ, पोलिस सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here