औंध,पुणे –
“चित्रपट निर्मितीला अलीकडे आता उद्योगाचा दर्जा मिळत आहे. चित्रपट निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत.परंतु ते रोजगार मिळवण्यासाठी कौशल्याची गरज लागणार आहे. चित्रपट उद्योगात प्रसिद्धी पैसा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी शॉर्टकटने ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळा ते अनेक अडचणीमध्ये अडकतात. परंतु जर गुणवत्तापूर्ण आपण या क्षेत्रात उतरलो आणि परिश्रम,संघर्षाची तयारी असेल तर नक्कीच या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कुठेही वशिला व पैशाची गरज लागत नाही.मराठी चित्रपटात ज्यांना काम करायचे आहे त्यांनी बिनधास्त काम करावे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता या चित्रपट सृष्टीत यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.” असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा “वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ”प्रसंगी मा. मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांनी प्रकट मुलाखती दरम्यान काढले.
महाविद्यालयाचा “वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा भारतरत्न भीमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे दि २७ मे २०२३ रोजी पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मा. मेघराज राजेभोसले यांना निमंत्रित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक मा. जितेंद्र वाईकर आणि महाविद्यालयाची विद्यार्थिनी गजाला सय्यद यांनी मेघराज राजेभोसले यांची प्रकट मुलाखत घेतली.
या मुलाखतीत मराठी चित्रपटाच्या भवितव्या विषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मेघराज राजेभोसले म्हणाले की, “ मराठी चित्रपट हे जागतिक दर्जाचे आहे. मराठी चित्रपटांना मराठी लोकांनी साथ द्यावी. चित्रपट कलाकार तसेच चित्रपटाशी संदर्भातील वेगवेगळ्या लोकांना चित्रपट महामंडळ वेगवेगळ्या सवलती देतात. त्याचा संबंधित लोकांनी लाभ घ्यावा. मराठी चित्रपटाचे भवितव्य उज्ज्वल असून या चित्रपटाकडे निदान मराठी माणसाने सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे” असे विचार त्यांनी मांडले.
यावेळी विचारमंचावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट निर्माता मा. भाऊराव कऱ्हाडे, टी डी एम चित्रपटाचे नायक पृथ्वीराज थोरात, नायिका कालिंदी निस्ताने, मा तानाजी कोरटकर आणि मा. बाळासाहेब धुमाळ, मा. इंद्रभान कऱ्हे, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा. भीमराव पाटील, उपप्राचार्य डॉ रमेश रणदिवे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण, आय क़्यु ए सी चेअरमन डॉ. सविता पाटील, माजी विद्यार्थी रविराज काळे, सूर्यकांत सरवदे, विद्यार्थिनी प्रतिनिधी शुभांगी शिंदे इ. उपस्थित होते. यावेळी टी डी एम चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले तसेच कवी विनायक पवार लिखित “ एक फुल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे” या गाण्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रसारण केले. तसेच टी डी एम चित्रपटातील नायक नायिकामधील काही संवाद यावेळी सादर करण्यात आले.
मेघराज राजेभोसले, भाऊराव कऱ्हाडे, टी डी एम चित्रपटाचे नायक पृथ्वीराज थोरात, नायिका कालिंदी निस्ताने, मा कोरटकर आणि मा. धुमाळ, या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांचे पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी केले. वार्षिक अहवाल वाचन कार्याध्यक्ष प्रा भीमराव पाटील यांनी केले. सूत्र संचालन प्रा सायली गोसावी यांनी तर आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी शुभांगी शिंदे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Home महाराष्ट्र तरुणांनी कौशल्य,परिश्रम व संघर्षाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीत यावे नक्कीच यश मिळेल...