शाळा अनुदान टप्यांसह शालार्थचे निकष शिथील करणार!

0

शिक्षणमंत्री केसरकर यांचे आमदार किशोर दराडे यांच्या सोबतच्या बैठकीत आश्वासन

येवला  प्रतिनिधी :

 २० टक्के,४० टक्के टप्पा अनुदानासाठी पात्र शाळांची कागदपत्रांची पुन्हापुन्हा होणारी पडताळणी टाळावी,शिक्षक भरती लवकरात लवकर करावी तसेच मान्यता प्राप्त शिक्षकांच्या शालार्थ साठीच्या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी आमदार किशोर दराडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.यावर टप्पा अनुदानासाठी कागदपत्रांची पडताळणी,शालार्थ साठीच्या अटीसह इतर निकष येतील करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

राज्यातील पात्र-अपात्र शाळा,प्रलंबित संच मान्यता, शिक्षक भरती,आवक व जावक मिळत नसलेल्या शाळांचे टप्पा अनुदान देण्याबाबत व त्याचे निकष शिथील करून शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

विधानभवन येथे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या दालानत भेट घेऊन,शिक्षण,शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. अनेक जुन्या शाळांमधील शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शिक्षकांची कमतरता असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने शिक्षक भरतीला चालना द्यावी अशी मागणी दराडे यांनी केली.त्यावर लवकरच निर्णय घेऊन टप्प्याटप्प्याने ५० हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याचेही आश्वासन केसरकर यांनी दिले

शालार्थ आयडीसाठी असलेले १२ निकषापैकी सहा निकष पूर्ण केलेले असले तरी मान्यता देण्यात यावी अशी मागणी दराडे यांनी केली.निकष पूर्ण करतांना येणा-या अडचणीही दराडे यांनी यावेळी निर्देशनास आणून दिल्या.२० टक्यांहून ४० टक्के तर,४० टक्यांहून ६० टक्के शाळा अनुदानित करतांना शिक्षण विभागाकडून प्रत्येकवेळी पडताळणी केली जात असून यासाठी अनेक निकष लावले जात आहे.वास्तविक २० टक्के,४० टक्के अनुदान देतांना शाळांची पडताळणी झाली असून शाळांनी निकष पूर्ण केलेले असते,मग प्रत्येक वेळेस कागदपत्रांची पडताळणी केली जाते यात वेळ जाऊन शिक्षकांचा वेळेत पगार मिळत नाही त्यामुळे यातील निकष शिथील करण्यात यावे अशी आग्रही मागणी दराडे यांनी केली.  शिक्षणमंत्री केसरकर यांनी अनुदानातील निकष शिथील करण्याबाबत योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल असे आश्वासन दिले.शिक्षकांचे वेळेत वेतन होत नसल्याची तक्रार दराडे यांनी यावेळी केली.त्याबाबत शिक्षण विभागास तात्काळ लक्ष घालण्याचे निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले.बैठकीस शिक्षण आयुक्त सूरज मांढरे,शिक्षण सचिव रणजीतसिंह देवल,समीर सावंत यांसह विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here