सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित विधी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आता ५० टक्के नवे तर सर्व वर्षांचे मिळून सरासरी ४० टक्के गुण मिळाले तरी पदवी मिळणार आहे.
बोर्ड ऑफ डिनच्या बैठकीत विधी अभ्यास मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी यंदापासून होणार आहे.
पुणे, मुंबईसह बहुतेक अकृषिक विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमातील विधी विषयासाठी ५००पैकी सरासरी ४० टक्केच गुणांनाच पदवी दिली जाते. मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ही अट ५० टक्क्यांची होती.हा निकष बदलावा, अशी मागणी प्रयास बहुद्देशीय संस्थेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर विधी अभ्यास मंडळाच्या दोन बैठका पार पडल्या.विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर विद्यापीठ स्थापनेपासूनचा निर्णय बदलून आता विधी पदवीसाठी सरासरी ४० टक्के गुणांचा नियम करण्यात आला आहे.