येवला प्रतिनिधी :
केंद्र शासनाच्या 40% निर्यात मुल्य आकारणीचा शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने आज कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रस्त्यावर ठिय्या मांडुन, रस्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने कोणाची मागणी नसताना कांदा निर्यात शुल्कात 40% वाढ करून शेतक-याला अर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम करून हे सरकार शेतक-यांच्या हिताचे नाही हे सिद्ध केले आहे.
मे महिन्या पर्यंत कांदा दोन तीनशे रूपये क्विंटल दराने विकला गेला तेव्हा सरकार झोपले होते. सोयाबीनला बरा भाव मिळत असताना सोयाबीन तेल आयात करून स्थानिक बाजार भाव पाडले.मे महिन्यात टोमॅटो शेतक-यांनी रस्त्यावर फेकून दिला त्याचा लाल चिखल झाला त्यावेळी सरकार झोपले होते मात्र मागील महिन्यात पुरवठा कमी मागणी जास्त झाली त्यामुळे टोमॅटोला भाव मिळु लागताच नेपाळहून टोमॅटो आयात करण्याचे फर्मान काढले. कापसाच्या गाठी आयात करून कापसाचे भाव पाडले मग या सरकारला शेतकरी मुक्त भारत करायचा आहे का? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
अशा शेतकरी विरोधी धोरणाचा शरद जोशी स्थापित संघटना तिव्र निषेध करते. आणि कांदा निर्यात शुल्कात 40% केलेल्या वाढीचा निषेध,म्हणून आज चक्का जाम करून नगर मनमाड रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आला सर्व शेतक-यांनी आजचे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे असून केंद्र सरकारने तातडीने चाळीस टक्के निर्यात मुल्य आकारणीचा अध्यादेश रद्द करावा अन्यथा शेतकरी लोकप्रतिनिधीना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन करण्यात येईल याची केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेण्याचा ईशारा या प्रसंगी शेतकरी संघटनेच्या नेत्यानी दिला.
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, सौ.संध्याताई पगारे, संचालक, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती. शेतकरी संघटनेचे येवला तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब पगारे,अरूण जाधव, जाफरभाई पठाण,शिवाजी वाघ,सुरेश जेजूरकर, , आनंदा महाले, राऊसाहेब गायकवाड, सुनिल गायकवाड, नारायण बारहाते,निलेश महाले,दत्तात्रय गायकवाड, प्रविण गायकवाड, आणि सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.