कृतज्ञता व्यक्त करत आमदार दराडे बंधूच्या पुढाकाराने स्व.कदम यांच्या कुटुंबाला साडेसहा लाखांचा धनादेश सुपूर्द
येवला, प्रतिनिधी :
संत तुकाराम महाराज म्हणतात…
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ।
तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।
ज्या शिक्षकाने शिक्षण संस्थेचे रोपटे लावण्यासाठी पहिल्या दिवसापासून साथसोबत केली आणि तब्बल २२ वर्षे निस्वार्थी भावनेने सेवा केली,त्या सहकारी शिक्षकाचे अपघाती निधन झाल्याने नक्कीच मनाला वेदना होतील..!या वेदनाची सल मनात न ठेवता माणुसकीची भावना जपत आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पुढाकार घेऊन संस्थेतील अपघातात निधन झालेले शिक्षक रमेश कदम यांच्या कुटुंबीयांना तब्बल साडेसहा लाख रुपयांची मदत दिली आहे.आपल्या शिक्षकाप्रती दराडे बंधूंनी दाखविलेली कृतज्ञता कदम कुटुंबियांसाठी आधारवड ठरली आहे.
नातं कोणतेही असू द्या ते संकटाच्या काळातच पाजळले अन पारखले जाते…जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जपलेले माणुसकीचे नाते ही असेच..! स्व.कदम यांच्या कुटुंबावर अचानकपणे ओढवलेल्या संकटकालीन परिस्थितीत मदतीचा हात दाखवत दराडे बंधूनी माणुसकीचा आदर्श उभा केला आहे.
बाभुळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य रमेश कदम यांचा ममदापूरला घरी दुचाकीवर जात असतांना अपघात झाला तर उपचारादरम्यान त्यांचावर काळाने अचानक झडप घातली होती.कुटुंबाचा कर्ता पुरुषच हरवल्याने आई,पत्नी,मुलगा आणि दोन मुलीचे छत्र हरवले आहे.स्व.कदम स्वभावाने खूप शांत,प्रेमळ, प्रामाणिक अन् कष्टाळू असल्याने संस्थेत सर्वांच्याच मनात आदराचे स्थान निर्माण केले होते.त्यामुळे सर्व स्तरातून हळहळही व्यक्त झाली. विनाअनुदानित कृषि विद्यालय असल्याने शासकीय मदतही मिळणार नसल्याने आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेतील सुमारे हजार कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते.या सूचनेनुसार प्रत्येकानेच आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबियांना मदत दिलीच,शिवाय स्वतः आमदार दराडे बंधूंनीही मोठी रक्कम यामध्ये टाकून सुमारे साडेसहा लाख रुपयांची मुदत ठेव पावती करून या कुटुंबीयांना दिली आहे.मुदत पूर्ण झाल्यावर सुमारे साडेदहा लाख रुपये रक्कम कदम कुटुंबियांना मिळणार असून मोठा आधार मिळणार आहे.
ममदापूरच्या कदम कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा मोठा हात देवून दराडे बंधूनी माणूसपण जपले आहे.या रक्कमेची ठेव पावती कुणाल दराडे यांनी घरी जाऊन कदम कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. एकीकडे माणुसकीची भावना दुर्मिळ झाली असताना दराडे बंधूकडून मिळालेल्या या मदतीमुळे कदम कुटुंबियांना भावना अनावर झाल्या होत्या.स्व.कदम सर पहिल्या दिवसापासून संस्थेत होते.संस्थेचे रोपटे लावून वटवृक्षात रुपातर करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. ते फक्त कार्मचारीच नव्हते तर ते आमच्या परिवाराचे सदस्य देखील होते.त्यांच्या जाण्याने कुटुंबाचे व संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.हि मदत सरांची उणीव भरणार नाही.पण अडचणीत कुटुंबाला मदत करण्याचे आमचे कर्तव्य आहे,ते आम्ही जपत राहू असे यावेळी बोलतांना कुणाल दराडे यांनी सांगितले.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सुधिर जाधव,दत्तात्रय वैद्य,माजी सरपंच सुभाष वाघ,रवि दाणे,जनार्दन उगले,शरद वाघ,धर्मा वैद्य,कांतिदास बैरागी, रमेश जानराव,सोपान जाधव, चंद्रहार साबळे,गणेश साळवे, नवनाथ शिंदे आदि उपस्थित होते.