पैठण,दिं.७.(प्रतिनिधी) : पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील भिमाशंकर विद्यालय मुधलवाडी परीसरात छत्रपती संभाजीनगरला जाणा-या जलवाहिनीच्या खड्यात पडून एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिं.६ रोजी सकाळी घडली.उस्मान दगडू शेख रा.मुधलवाडी ता.पैठण असे मयताचे नाव आहे.
या बाबत पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पैठण -छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भिमाशंकर विद्यालय (मुधलवाडी परिसर)येथे जलवाहिनी साठी खोदण्यात आलेल्या खड्यात उस्मान दगडू शेख वय ७० रा.मुधलवाडी हे पडल्याने ते गंभीर जखमी झाले. या बाबतची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यास या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच सपोनि निलेश केळे, पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील झिंजुर्डे, पोलिस कर्मचारी गणेश खंडागळे, राहूल महोतमल यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी उस्मान शेख यांना खड्याच्या बाहेर काढत पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. पुढील तपास पोलीस जमादार गणेश खंडागळे हे करत आहेत.