कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून गेल्यावर्षीचा हिशेब झाल्याशिवाय एकही कारखाना चालू करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा 400 रुपये अधिक द्यावे. ते पैसे दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत तसेच अन्य विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज कोल्हापुरात विराट मोर्चा काढण्यात आला.
पैसे देत नाहीत तोपर्यंत गप्प बसणार नाही
राजू शेट्टी यांनी सांगितले की, जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाहीत, पैसे देत नाहीत तोपर्यंत गप्प बसणार नाही. आम्ही एफआरपी अधिक 400 रुपये ही नवीन मागणी केलेली नाही. आम्ही गेल्यावर्षी ऊस परिषदेत ही मागणी केली होती. एफआरपी अधिक 400 रुपये मागत आहोत. कोल्हापुरातील सभेत अजितदादांनी आश्वासन काय दिली माहीत नाही. आम्ही देखील 400 रुपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.
हे सरकार कुठल्याच विषयावर गंभीर नाही
शेट्टी यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा इशारा देऊनही काही होत नसेल, तर बेजबाबदारपणा म्हणायचं तर काय म्हणायचं? हे आंदोलन मोर्चाने संपणार नाही. गळीत हंगामावर भाष्य करताना ते म्हणाले की, हंगाम कधीही सुरु होऊदे यावर्षी कोणताही कारखाना तीन महिने अधिक चालू शकत नाही, अशी स्थिती आहे. गेल्यावर्षीचा हिशेब झाल्याशिवाय एकही कारखाना चालू करू देणार नाही.
400 रूपये तात्काळ द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी
दरम्यान, राज्यातील ऊस ऊत्पादकांना दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान 400 रूपयाचा दुसरा हप्ता देण्याबाबत कारखानदारांना आदेश करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. अजित पवार उत्तर सभेसाठी कोल्हापुरात आले असता स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करत लवकरच कारखानदारांना सुचना करू असे आश्वासन दिले. यंदा साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले आहेत, याकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर राज्यातील साखर कारखान्यांमध्ये राजरोसपणे काटामारीचे प्रमाण वाढले असून राज्यातील कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात आली आहे