पंढरपुर : मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उपरोधिकपणे टोला लगावला. ‘मराठा समाजाला महिनाभरात आरक्षण मिळेल की नाही, हे सांगायला मी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री नाही,’ असे विधान संभाजीराजेंनी केले.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघासह राज्यातील ४८ जागा स्वराज्य पक्ष स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणाही संभाजीराजे छत्रपती यांनी पंढरपुरात बोलताना केली. यावेळी त्यांच्यासोबत स्वराज्य पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष महादेव तळेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजीराजे छत्रपती हे शुक्रवारी (ता. १५ सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात संभाजीराजे बोलत होते. मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यांच्या हस्ते सरबत घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. जरांगे यांनी सरकारला एक महिना दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यात उपोषण मिळेल की नाही, असा प्रश्न संभाजीराजेंना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस आणि पवारांवर निशाणा साधला होता.
माझी आरक्षणासंदर्भातील भूमिका मी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे. तो एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, आधले-मधले लोक गडबड करतात, त्यातून मराठा-ओबीसींमध्ये वाद वाढू पाहात आहे. नारायण राणे यांच्या विधानावर मात्र आमच त्यांचे म्हणणे ऐकले नाही, असे सांगितले. तसेच, मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे न्यायालयात टिकणारे असावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
चप्पलांवर पाय पडताच संभाजीराजे चिडले
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला संभाजीराजे यांनी शुक्रवारी सायंकाळी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पत्रकारांबरोबरच काही कार्यकर्तेही आले होते. त्यामुळे गर्दी झाली होती. त्या गर्दीतील एकाचा संभाजीराजेंनी पायऱ्यांवर सोडलेल्या त्यांच्या कोल्हापुरी चप्पलांवर पाय पडला. हे त्यांच्या बॉडीगार्डच्या लक्षात आले. त्यांच्या बॉडीगार्डने संबंधित व्यक्तीला बाजूला ओढले. तसेच, खुद्द संभाजीराजेही त्याच्यावर चिडल्याचे दिसून आले. बाजूला सोडलेल्या चप्पलांवर अजाणतेपणे पाय पडल्यानंतर संभाजीराजे चिडल्याचे पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.