पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळेंच्या यशस्वी मध्यस्थी मातंग समाजाचे उपोषण मागे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या यशस्वी मध्यस्थीने शुक्रवार (दि.१५) रोजी मागे घेण्यात येवून उपोषणकर्ते फकिर चंदनशिव यांनी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेवून आपले उपोषण मागे घेतले आहे.

सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांनी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोपरगाव येथे सुरु आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणकर्ते फकिर चंदनशिव यांची राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांनी भेट घेवून त्यांच्याशी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्या मागण्यांपैकी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व्हावे व कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने सुरु करावे या प्रमुख मागण्या होत्या. त्या मागण्यांपैकी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण मागील वर्षी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते नियोजित होते मात्र त्यामध्ये राजकारण आणले गेल्यामुळे दुर्दैवाने ते होवू शकले नाही. दोनच दिवसांपूर्वी आ. आशुतोष काळे यांनी शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिल्या असून त्याबाबत कार्यवाही सुरु झाली आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करून उपोषणकर्ते फकिर चंदनशिव व आ.आशुतोष काळे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होवून त्यांच्या यशस्वी मध्यस्थीतून फकिरा चंदनशिव यांनी आमरण उपोषण मागे घेत आ. आशुतोष काळेंच्या हस्ते लिंबू पाणी घेवून उपोषण सोडले.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार संदीपकुमार भोसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here