यवतमाळ : हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात आपल्या कार्याची सुरवात केली. हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. हेमंत भाऊ या नावाने ते या दोन्ही जिल्ह्यात परिचित आहेत. हिंगोली मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात वणवा पेटला आहे. अनेक गावांमध्ये नेते, मंत्री, आमदार यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय.
जिथे जिथे नेते जातील तिथे मराठा आंदोलक जाऊन त्यांचा निषेध करत आहेत. मराठा आरक्षणासाठी विविध जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी आपापले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरले आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे .
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना ते म्हणाले की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल. राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकारला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. असे आवाहन त्यांनी केले आहे.