भारताचा अमृतकाल व्याख्यानमालेस दि.२६ पासून प्रारंभ !!
सातारा/अनिल वीर : संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने या वर्षाचा २५ वा महामाता भीमाबाई आंबेडकर पुरस्कार मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या साहित्यिक छाया कोरेगावकर यांना जेष्ठ साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते संविधान दिनी Bhimabai Ambedkar Award on Constitution Day रविवार दि.२६ रोजी येथील नगर वाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये सकाळी अकरा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी,”भारताचा अमृत काल” या विषय सूत्रावरील ३७ व्या व्याख्यानमालेचा प्रारंभ होणार आहे.त्याची तयारी,नियोजन पुर्ण झाले आहे, अशी माहिती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.
महामाता भीमाबाई आंबेडकर पुरस्कार वितरण समारंभानंतर प्रा. गौतमीपुत्र कांबळे ‘ भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता ‘ या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.मंगळवार दि. २८ रोजी सायंकाळी सहा वाजता रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे हे ‘ महात्मा फुले यांच्या स्वप्नातील भारत व सत्यशोधक समाज’ या विषयावर बोलणार आहेत.बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी सहा वाजता नामवंत वक्ते अभ्यासक प्रा. सरफराज अहमद (सोलापूर) हे
‘ अल्पसंख्याकांचे प्रश्न व भारताचे भवितव्य ‘या विषयावर मांडणी करणार आहेत.गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर (संगमनेर) या “महिला आरक्षणाचे भवितव्य”यावर बोलणार आहेत.
शनिवार दि.२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध कायदातज्ञ ॲड. असीम सरोदे (पुणे) हे ‘भारतीय संविधान व मानवी हक्क’ या विषयावर बोलणार आहेत.रविवार दि.३ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता कायद्याच्या अभ्यासक आय.एल.एस.लॉ कॉलेज (पुणे) येथील सेवानिवृत्त प्रा. जया सागडे या ‘समान नागरी कायदा संहिता’ या विषयाची मांडणी करणार आहेत.मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार प्रशांत रुपवते व डॉ. तुषार जगताप (मुंबई ) हे ‘आरक्षणाचा जटिल प्रश्न’ या विषयाची मांडणी करणार आहेत. बुधवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.सदरच्या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहावे. असे आवाहन कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.