रेठरे बु॥ प्रतिनिधी : – ‘अनिल कळसे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ घोषणा देत शोकाकूल वातावरणात रेठरे खुर्द, ता.कराड येथील शहीद जवान अनिल दिनकर कळसे यांना हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.
शासकीय इतमामात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांना अग्नी देणार्या त्यांच्या लहानग्या आर्यन च्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थित जनसमुदाय ही गहिवरला.
शनिवारी (दि. 23) रोजी सकाळी 9.30 वाजता तिरंग्यात लपेटलेले कळसे यांचे पार्थिव रेठरे खुर्द येथे दाखल झाले. ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली होती. शहीद जवान कळसे यांचे पार्थिव त्यांचे घरी दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश करत त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर घोषणा देत पार्थिव जाई मोहिते प्रशाळेजवळ आणण्यात आले.
अंत्ययात्रेमध्ये वीर जवान तुझे सलाम,भारत माता की जय,अमर रहे, अमर रहे, अनिल कळसे अमर रहे,अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
तिथे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराडचे तहसीलदार,नायब तहसीलदार,गटविकास अधिकारी तसेच विविध अधिकारी पदाधिकारी तसेच कॅप्टन रोहित,कॅप्टन निपुण भट्टा,सुभेदार पुसुगडे सुभेदार वाशिम खान,सुभेदार हाके,सुभेदार मंगेश आहिरे,267इंजिनियर्स रेजिमेंट नायब सुभेदार एच पी मोरे,नायभ सुभेदार एस आर पाटील,सुभेदार मेजर मोहन पाटील,इंजिनियर्स रेजिमेंट च्या वतीने कॅप्टन जयंत यादव,तसेच रेठरे खुर्द च्या विविध संस्थांचे पदाधिकारी ,प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ,यांच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर शहीद जवान अनिल कळसे त्यांना अग्नी देणार्या त्यांच्या लहानग्या आर्यनच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थित जनसमुदाय गहिवरला. शहीद जवान कळसे यांचा मुलगा इयत्ता पाचवी वर्गात शिकत असून मुलगी श्रध्दा इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. कळसे यांची पत्नी आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी कराड आगाशिवणगर येथे वास्तव्यास आहे. मुलांच्या डोईवराचे बापाचे छात्र हरपल्याने कळसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.