सोलापूर : विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात वेगवान हालचाली होत आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे येत्या रविवारी (ता.11 ऑगस्ट) बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रथमच बार्शीत येत आहेत, त्यामुळे पवार काय बोलणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. एकेकाळचे जुने सहकारी, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर ते भाष्य करणार का? आणि विश्वास बारबोले यांच्या विधानसभा उमेदवारीच्या संदर्भात कोणती भूमिका मांडणार, याकडे बार्शीकरांचे लक्ष असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून मेळावे, बैठका घेतल्या जात आहेत. काही पक्षांकडून यात्रा काढल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही विधानसभानिहाय सभा, मेळावे घेतले जात आहेत. त्यातूनच बार्शीच्या मेळाव्यासाठी शरद पवार येणार आहेत.
बार्शीतील शेतकरी मेळाव्याला शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण मेळाव्याला येणार असले तरी शरद पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
पवारांचे एकेकाळचे जवळचे सहकारी दिलीप सोपल यांनी मागील निवडणुकीत साथ सोडून शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले होते. शरद पवार यांनी मागील निवडणुकीतील प्रचारात दिलीप सोपल यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर पवार हे बार्शीत येत आहेत, त्यामुळे सोपालांबाबत त्यांच्या मनात सध्या काय सुरू आहे, याचा अंदाज बार्शीकरांना येऊ शकतो.
बार्शी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे इच्छुक आहेत. पण, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटतो, त्यावरच बारबोले यांच्या उमेदवारीचे गणित अवलंबून आहे. बार्शी मतदारसंघ आणि बारबोले यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार काय भाष्य करतात, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. कोरोना काळात आमदार रोहित पवार हे बार्शीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रोहित पवार यांनी आवर्जून घरी जाऊन सोपल यांची भेट घेतली होती. त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली होती. त्यामुळे पवार आणि सोपल घराण्यात अजूनही सलोख्याचे संबंध असल्याची चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही बाजूकडून कोणतंही राजकीय भाष्य करण्यात आलेले नाही.