सातारा (अनिल वीर) : महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सातत्याने जिल्ह्यातील नेत्यांच्या व राजांच्या लढती हाय होल्ट असतात. परंतु साताऱा विधानसभा निवडणुकीमध्ये राजांच्या विरोधात लढण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.मात्र, राजा विरुद्ध प्रजा अशीच निवडणूक मी लढणार आहे.अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर व्यक्त केली.
अनेक दलित नेते मुजरा करून इतरांच्या नावाने शिमगा करतात. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांना लढण्याचे आदेश दिले आहेत. म्हणूनच दादासाहेब ओव्हाळ यांनी सातारा-जावली विधानसभेसाठी लढणार असल्याचे ठामपणे जाहीर केले आहे.जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत. त्याचपद्धतीने शोषित वंचितांचे पण नेते अनेक आहेत. परंतु सातारा विधानसभा निवडणूक लढवण्याचे धैर्य कुठल्याही नेत्यांमध्ये नाही. म्हणूनच मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष तथा राज्याचा उपाध्यक्ष तसेच दलित चळवळीमध्ये सातारा शहर व जिल्ह्यात काम करणारा बहुजन अनुयायी म्हणून माझी उमेदवारी आहे. माझ्याबरोबरचे काही मोठे झाले आणि माझ्यापेक्षा छोटी असणारे सुद्धा काही मोठे झाले. पण त्यांनी कधीही तत्त्वनिष्ठ न राहता सातत्याने राजे महाराजांची हुजरेगीरी केली आहे.म्हणूनच मी आणि आमच्या काही स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ठरवलं की सातारा विधानसभा लढवायची आहे.
यावेळी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, पश्चिम महाराष्ट्र युवकचे उपाध्यक्ष सुरेश पवार,युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दामिनी निंबाळकर,महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रंजना जाधव, युवकचे अध्यक्ष अतुल कांबळे, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश मोहोळ,सुनील ओव्हाळ, अशोक ओव्हाळ, कार्याध्यक्ष आनंद गाडीवडार,शेखर आढागळे, सागर समाधान मदाडे, अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.