आज जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हेलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातोय. मात्र सहा वर्षांपासून हाच दिवस देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी काळा दिवस ठरला. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करून हा दिवस रक्तरंजित केलाय. भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्हयातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील, लेथापोरा या अवंतीपोर जवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर 14 फेब्रुवारी 2019 ला दुपारी सुमारे 3.15 वाजता एका आत्मघाती हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केला. त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. जम्मूतील चेनानी रामा संक्रमण शिबिरातून जवानांचा ताफा श्रीनगरकडे रवाना झाला होता. पहाटे निघालेल्या सैनिकांना सूर्यास्त होण्यापूर्वी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममधील संक्रमण शिबिरात पाहेचायचे होते. ताफा आपल्या मुक्कामावर सूर्यास्तापूर्वी पोचणे अपेक्षित होते. हा प्रवास सुमारे 320 कि.मी. अंतराचा होता आणि पहाटेपासून सैनिक प्रवास करीत होते. हल्ला झालेल्या ठिकाणापासून श्रीनगरचे अंतर जेमतेम 33 कि.मी. एवढे होते. हा हल्ला जैशचा बदला मानला जात होता. कारण हल्ल्याच्या दोन दिवस आधीच पुलवामाच्या रत्नीपोरा भागात सुरक्षा दलांनी एका चकमकीत जैशचा एक दहशतवादी मारला होता. पण भारतानेही या हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्याच्या काहीच दिवसांनी भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसुन बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्या दिवशी जैशच्या ठिकाणी हल्ला करुन भारताने 300 पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले होते.
आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो असे त्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव होते. या अपघातानंतर त्या हल्लेखोराचा एक व्हिडियोपण प्रसारित करण्यात आला होता. या हल्ल्यात एका महिंद्र स्कॉर्पियो वाहनाचा वापर करण्यात आला होता. या वाहनात सुमारे 300 किलो स्फोटके भरलेली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे 40 सैनिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर हल्लेखोर देखील मरण पावला. या काफिल्यात सुमारे 78 वाहने व सुमारे 2500 पेक्षा जास्त सैनिक होते. मात्र पुलवामामध्येच जैशच्या दहशतवाद्यांनी या जवानांना लक्ष्य केले. सैनिकांच्या या ताफ्यातील अनेक सैनिक आपली रजा संपवून कर्तव्यावर परतले होते. जैशला या ताफ्यातील सर्व 2500 सैनिकांना लक्ष्य करायचे होते. हल्ल्यानंतर सीआरपीएफ अधिकाऱ्याने या हल्ल्याची माहिती दिली होती. ताफ्यात सुमारे 78 बसेस होत्या पण फक्त एका बसवर हल्या झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. हा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तान स्थित इस्लामिक गट जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने काश्मीरची वृत्तसंस्था जीएनएसला टेक्स्ट मॅसेज पाठवून या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 जवानांच्या बसमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील कॉन्स्टेबल ठका बेलकर यांचाही समावेश होता. हल्ल्याच्या आधीच काही दिवस त्यांचे लग्न ठरले होते. कुटंबातील मंडळी त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. बेलकर यांनी रजेसाठी अर्ज केला होता. परंतु त्यांची रजा मंजूर झाली नव्हती. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांसोबत तेही या बसमधून निघाले होते. परंतु बस सुटण्याआधी काही वेळ त्यांना मोबाईलवर रजा मंजूर झाल्याचा मेसेज आला आणि ते बसमधून खाली उतरले. त्यानंतर काही वेळातच या बसवर हल्ला झाला. पण काही वेळापूर्वी आलेल्या मेसेजमुळे बेलकर यांचे प्राण वाचले.
पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली. त्यात 40 जवान शहीद झाले. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले होते. शहिद झालेल्या 40 शहिदांमध्ये सीआरपीएफच्या 76 व्या बटालियनच्या 5 जवानांचा समावेश होता. स्फोट एवढा जोरदार होती की, काही काळ सर्वत्र धुळीशिवाय काहीच दिसत नव्हते. धुर दूर होताच तेथील भयावह दृश्य पाहून संपूर्ण देश त्या दिवशी रडला हाता. या हल्ल्यात जवानांच्या मृतदेहाचे तुकडे इकडे-तिकडे विखुरले गेले होते आणि घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या भ्याड हल्ल्यानंतर या घटनेच्या जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आणि संपूर्ण देशातून संतापजनक व्यक्त करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ हा दर्जा काढून घेतला. पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि देशभरात या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आजच्या दिनी त्या सर्व शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
प्रविण बागडे ,नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919 ,ई-मेल : pravinbagde@gmail.com