धर्ममार्तंडांनो ! अरे, आता तरी विज्ञानवादी बना !

0

हाकुंभ मेळा 2025 हा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत आहे. प्रयागराज हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले महत्त्वाचे शहर आहे. ते पूर्वी प्रयाग ‘यज्ञस्थळ’ म्हणून ओळखले जात असे. हा मेळा त्रिवेणी संगम येथे भरला, जो जगातील सर्वात मोठा सार्वजनिक मेळावा आहे. हा मेळावा गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगम येथे दर 12 वर्षांनी भरतो, जो आध्यात्मिक नूतनीकरण आणि मुक्तीची संधी देते. या मध्ये हिंदू पौराणिक कथांमध्ये लंगर घातलेला आहे. ज्‍या मेळ्यात सहभागी पवित्र नदीत स्नान करतात किंवा डुबकी मारतात. गंगेत स्नान केल्याने जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होऊन पापांपासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ती धादांत फसवी आहे, खोटी आहे. पाप आणि पुण्यांचा हिशेब इथेच द्यावा लागतो, इतरत्र जाण्याची गरज नाही. मग हे मेळावे, कुंभ मेळे, यज्ञ हे कशासाठी ?

     

कुंभमेळा हा केवळ जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा नाही. तो श्रध्दा, भक्ती आणि दैवी संबंधाच्या शोधाचा एक असाधारण संगम आहे. दर 12 वर्षांनी सर्व स्तरातील लाखो यात्रेकरु प्रयागराजला जातात. जिथे गंगा, यमुना आणि गुढ सरस्वती नदया पवित्र त्रिवेणी संगमावर एकत्र येतात. येथे ज्योतिष शास्त्रीयदृष्ट्या महत्वपूर्ण काळात ते पवित्र स्नानात स्वतःला विसर्जित करतात. ज्यावर त्यांचा विश्वास आहे की, पापे शुद्ध करण्याची, आत्म्याचे नूतनीकरण करण्याची आणि दैवाशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्याची शक्‍ती आहे, असं असलं तरी कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर मानवाच्या प्रवृत्तीत खरच बदल घडतो का? त्याच्या वागण्या बोलण्यात, आचरणात काहीतरी फरक पडतो का? हा चिंतनाचा विषय आहे. एकंदरीत त्‍याच्यात काहीच फरक न पडल्याचे दिसून येते, म्हणजे जैसे तिच परिस्थिती..?

         33 कोटी देवी-देवता मोक्षदाते म्हणून गाजले आहेत, परंतू एका मार्गदात्याचा मार्ग अडवू शकले नाहीत जो आज जागतिक स्तरावर पाय रोवून तटस्थ उभा आहे, ही भारताची शोकांतिका आहे. ज्यामुळे वैदिक धर्म अडचणीत आला आहे, म्हणून कुंभमेळयाचा उपदव्याप आयोजित केला आहे. या दरम्यान एक अनुचित प्रकार घडला. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 14 वर प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. एलएनजीपी रुग्णालयाने 18 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि अनेक जण जखमी असल्याचे सांगितले ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रेल्वेने प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी 4 विशेष गाड्यांची व्यवस्था केली. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.

         पाप केल्याची भिती ज्यांना वाटते त्यांनीच गंगेत बुडी मारली, पण वास्तव वेगळंच आहे. ज्यांनी काहीच केलं नाही ती माणसं कुंभमेळयात किंवा गंगेत बुडी मारण्यासाठी उतावीळ झाली नाहीत, कारण ती माणसं अंधश्रध्दाळू नव्हती, तर ती विज्ञानवादी होती. पुढील काळात जगातील सर्व चळवळी, धर्म, परंपरा संपुष्टात येतील आणि विज्ञानालाही बुध्दाशिवाय चालता येणार नाही. देवी-देवतांचे पुजन करणाऱ्या भारत देशात बहुजनांच्या वागण्यात, बोलण्यात, नित्यक्रमात काही बदल झालेला आहे काय? तर उत्तर नकारार्थी मिळेल. कारण त्यापासून काहीच साध्य करता आले नाही, उलट आहारी गेल्यामुळेच कर्जबाजारी, मनशांती, समाधान वगैरे मिळेनासा झाला. एखादे कर्मकांड तर्काला पटत नाही म्हणून ते काम करु नये असे बुध्दिला वाटते पण परंपरेने चालत आल्यामुळे ते केलेच पाहिजे, असा भावनेचा हट्ट असतो अशी तर्कविहिन मानसिकता म्हणजे श्रध्दा. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात तत्वत: भेद नाही पण त्या श्रध्देपायी माणसाची लक्षणीय प्रमाणात हानी होते. त्या श्रध्देला अंधश्रध्दा म्हणता येईल, हे अधोगतीचे लक्षणच म्हणावे लागेल!

         समाजात दीर्घकाळ टिकून राहिलेली मोठया प्रमाणात आर्थिक हानी करणारी अंधश्रध्दा म्हणजे अंत्यसंस्कार, दशक्रिया, बारावे, तेरावे, चौदावे, मासिक श्राध्द हे विधी इतेक हास्यास्पद असतात की त्यांची निरर्थकता सहज कळते. पण परंपरेच्या दडपणामुळे आणि भयावह श्रध्देमुळे अनेकांना या विधीचा त्याग करता येत नाही. जे लोक निर्भयपणे अशा रुढी मोडतात ते उपरोक्त परंपरेच्या जोखडातून कायमचे मुक्त होतात. त्यांना कोणतीही इजा होत नाही, अनाठायी होणारा मोठा खर्च टाळता येतो, रुढी तोडल्यामुळे काहीही वाईट होत नाही, त्यासाठी विचारशक्ती जागृत ठेवली पाहिजे.

        

  माणसाला मारुन धर्म मोठा आहे असे जर वाटत असेल तर धर्मालाच नेस्तनाबूत करुन माणसाला संरक्षण दिले पाहिजे, कारण माणूसकीच धर्म आहे. रामा ! तुझी पवित्र गंगा सुरवातीपासूनच दुषित मळलेली आहे. कारण तिने पाप केलेल्या माणसाचे पाप धुतले अशी आख्या आहे. मग मी पुन्हा पाप कसे धुऊ शकते ? सरकारी आकडे बघा गंगा कशी दुषित आहे. प्रयागराजगध्ये गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डाने 73 ठिकाणी पाण्याची चाचणी करून अहवाल राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाला सादर केला. प्रयागराज महाकुंभात गगा-यमुनेच्या संगमावर स्नान सुरू आहे आणि आतापर्यंत 60 कोटींहून अधीक भाविकांनी स्नान केले आहे. दरम्यान केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही नद्यांचे पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचे म्हटले जाहे.

                   अचानक एखादी चुक झाली तर ती सुधारण्यासाठी गंगेत बुडी मारली तर ते पाप धुतल्या जाऊ शकत नाही, ते इथेच भरुन द्यावे लागते. आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना वृध्दाश्रमात ठेवून कुंभमेळयात गेलेल्या लोकांचे पाप कसे  धुतल्या जाऊ शकेल ? हा विवेकी विचार तांत्रिकदृष्टया महत्वाचा आहे. आज आपण 21 व्या शतकात वावरत असतांना असं चुकीचं भाष्य करणं किंवा वागणं मुर्खपणाचे लक्षण नाही काय? माणसाला अंधश्रध्दा दैववादी बनविते आणि दैववाद हा नेहमी घातक असतो. कारण परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे, तेव्हा बदलणं गरजेचं असतं. वेळेनुसार, माणसानुसार, परिस्थितीनुसार…! जर स्वत:ला नाही बदललं तर आपलीच किंमत आपोआप कमी होत जाते. काही बदल जाणीवपूर्वक करावेच लागतात, बाकी सर्व थोतांड आहे, हे ध्यानी ठेवावे. तेव्हा विवेकवादी, विज्ञानवादी, तर्कनिष्ट बनण्याची नितांत गरज आहे.

        

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. यासोबतच त्यांनी जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लिहिले: “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल ऐकून खूप दुःख झाले. मी शोकाकुल कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करते”. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले: “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी पाहून मी दुःखी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो”.

         महाकुंभाच्या आयोजनासाठी राज्य सरकारने 5425 कोटी 58 लक्ष रुपयांचे बजेट राखीव ठेवले आहे आणि या कार्यक्रमासाठी सुमारे 7500 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच केंद्र सरकारने 2100 कोटीची तरतुद केली आहे. हीच रक्कम रोजगार, विकास, शिक्षण, आरोग्य या साठी जर केली असती तर अधीक चांगले झाले असते, ते सरकारने करने गरजेचं होतं.

प्रविण बागडे

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20240624-WA00291-238x300-1-150x150-1.jpg

नागपूर भ्रमणध्वनी  : 9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here