” माझी माय मराठी ” 

0

स्मरल्या काही ओळी,आल्या मग ओठी. शब्दही पडले थिटे वर्णावया, ती माझी “भाषा मराठी’.

संस्कार आणि संस्कृतीचा सुरेल संगम

          म्हणजे “माझी मराठी”.

हिरव्यागार शेतांमधुन बहरणारी काळी माती

          म्हणजे “माझी मराठी”.

नदी नाल्यांच्या प्रवाहात अविरत वाहणारी ती 

          म्हणजे “माझी मराठी”.

समिंदराच्या लाटांवर अथांग प्रेमाने डोलणारी ती

          म्हणजे “माझी मराठी”.

ज्ञाना तुकयाच्या अभंगाने पुण्यपावन झाली ती

          म्हणजे “माझी मराठी”.

जनाई-बहिणाईच्या ओव्यांतून हळुवार काळजाचा ठाव घेणारी ती

          म्हणजे “माझी मराठी”.

आणि, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून विहरत, लहरत, फुत्कारत, छत्रपतींच्या समशेरीत तळपणारी ती म्हणजे “माझी मराठी”. ‘जशी माय हृदयात तशी मायबोली मुखात’. ‘माय’ या शब्दातून जेवढं प्रेम ओघळतं तेवढच प्रेम मायबोलीतूनही पाझरतं. कारण ही एकीचीच दोन रूपं आहेत.

    प्रमाण भाषा मराठी असली तरी मायबोली ह्या अनेक आहेत. माझी मायबोली ‘आगरी’. कधी दुधाळ, कधी मधाळ, कधी मुलायम, कधी खरखरीत, कधी मिश्किल तर कधी मिरच्यांच्या धूरी सारखी ठसकेबाज. 

     माझी आगरी बोली, जशी पुरणाची पोली,

    वाकऱ्यान शिरली, त मंग बंदुकीची गोली.

मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला आणि तीला राजाश्रयही मिळाला. दर्जेदार मराठी साहित्य निर्माण झाले. संत महात्म्यांनी तर जणू सरस्वती मातेला ग्रंथरूपात साकारून ठेवली. अमृताहुनी गोड अशा रचनांची निर्मिती झाली. सर्व अलंकारांनी माझी माय मराठी नटली, थटली, समृद्ध झाली. शब्दात, ओळीत, वाक्यात सामावलेलं हे वाड़मय प्रतिभावंत आहे यात शंका ती काय! सृष्टीतील सर्व रस, रंग, कला, भाव, भक्ती ही माय मराठीत एकवटली. 

   

परंतु अटकेपार नेता नेता कधी पानिपत झालं ते मात्र कळलच नाही. विदेशी इंग्रजांची गुलामी करता करता इंग्रजी भाषेने माय मराठी जीभेचा कधी ताबा घेतला ते समजलच नाही. अनेक इंग्रजी शब्द जीभेवर सहज रूळत गेले. सध्या तर प्रत्येक मराठी वाक्यात एखादा तरी इंग्रज उगवतोच.

      राजाश्रय मिळालेल्या माझ्या माय मराठीला मात्र इंग्रजीने पछाडलं. याला कारणही आम्हीच, तीचीच लेकरे. आम्ही तिला उंबरठाच ओलांडून दिला नाही. तिची व्याप्ती वाढवायचा प्रयत्नच केला नाही. विश्वाश्रय मिळवण्यासाठी नव्या जमान्याबरोबर विश्वाचं दर्शन करूनच दिलं नाही. विज्ञानाबरोबर जाऊच दिलं नाही. याउलट इंग्रजी भाषा, जी सुमार दर्जाची म्हटलं तरी चालेल किंवा जरा अळणीच, तरीही तीनं विश्वाश्रय मिळवून अधुनिक तंत्रज्ञानात शिरकाव करत, आज जगात अधिराज्य केले आहे.

     आजही माझी माय मराठी आक्रंदून सांगते आहे की आधुनिक तंत्रज्ञानात मला विकसीत करा, तशा साहित्याची निर्मिती करा. सध्या नवसाहित्य हळूहळू नवतंत्रज्ञानात बदलताना दिसते आहे. माय मराठीच्या बहिणी अर्थात बोलीभाषा विकसित होत आहेत. अनेक प्रतिभावंत साहित्यनिर्मिती करू लागले आहेत. 

     वाचनाची आवड कमी होऊन दृकश्राव्याकडे नवी पिढी वळत आहे. कागद पेन ही संकल्पना संपुष्टात येत आहे. कारण नवं तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसं दृकश्राव्य किंवा व्हिडीओ -व्हिज्युअल हे माध्यम खूपच प्रभावी आहे. लवकर आकलन होणारं आहे त्यामुळे या माध्यमाचा योग्य उपयोग करायला हवा. सध्याची पिढी हे माध्यम नको नको त्या उपद्व्यापांसाठी वापरते आहे हा चिंतनाचा विषय आहे. इथेही माझी मराठी मागे पडलीय. इंटरनेटवर मराठी भाषांची माहिती, शब्दकोष परिपूर्ण आहेत असं वाटत नाही. मराठीत निर्मिलेल्या माहितीतंत्रज्ञानाचा दर्जा काहिसा कमी वाटतो. यासाठी नव्यापिढीची साथ मायबोलीला मिळाली तर उत्क्रांती होऊ शकेल. म्हणून आपणही डिजिटल बनलच पाहिजे.

    मराठी मिडियम बंद होत चाललय. मिडियम या शब्दावरूनच समजावं. इथंही इंग्रजांनी आम्हाला सोडलं नाही. यांचं अनुकरण करणं हे आद्य कर्तव्य व इंग्रजी ही भाषा जगण्याचं टॉनिक असल्यासारखं आमचे पालक करू लागलेत. आमचे माय मराठी पालक बाळाला बोबड्या बोलीतून..’ हँड वाॕश कर, टीफीन फिनीश कर, हे टेक हं, ते टेक हं, हाय कर नी बाय कर’ हे शिकवताहेत आणि आमची भावी माय मराठी बालके त्याच शिक्षणाची परतफेड करत मराठीच्या चिंधड्या करताहेत. ‘सुर्योदय झाला’ च्या ठिकाणी ‘सन उगला’ म्हणणाऱ्या पिढीला हसावं की माय मराठीला आठवून मंथन करावं..काहीच कळत नाही.

भूतकाळात सुवर्णाक्षरांनी नटलेल्या अन् वर्तमानात साजशृंगार चढवलेल्या माझ्या माय मराठीचा भविष्यकाळ नव्या पिढीकडे सोपवताना मन मात्र जरासं घाबरतय…

संजीव व्यंकटेश म्हात्रे. खोपटे -उरण. 9870561510.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here