ज्याचक मोजणीमुळे शेतकरी वैतागले , माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्याकडे केला पाठपुरावा
सोनेवाडी (प्रतिनिधी) शिर्डी सिन्नर नॅशनल हायवे एन एच 160 चे काम सध्या सुरू आहे. रस्त्याच्या कामादरम्यान झगडे फाटा येथे उड्डाण पुलाची निर्मिती केली आहे. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच इमारती बाधित झालेल्या आहेत. या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड वैतागले असून झगडेफाटा उड्डाणपूलाच्या कामासाठी बाधित झालेल्या घरांचा व जागेचा योग्य मोबदला मिळाला नाही तर महामार्गाचे काम होऊ देणार नाही बाधित कुटुंबांना बरोबर घेत आंदोलन करू असा इशारा माजी सरपंच केशवराव होन यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्याशी चर्चा करत पाठपुरावा केला असता कोल्हे यांनी देखील यात लक्ष घालणार असल्याचे सांगितले. गेल्या तीन वर्षापासून या महामार्गाचे

काम सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील झगडे फाटा परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांचे घरे यामध्ये बाधित झाले. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी देखील या कामात बाधित झालेले आहेत. मोजणी ऑफिस ,पीडब्ल्यूडी यांच्यामार्फत बाधित कुटुंबांना सरकारच्या वतीने मोबदला मिळण्यासाठी मोजणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र एन एच 160 नॅशनल हायवे चे अधिकारी या मोजणी दरम्यान खोडा घालण्याचे काम करत असून शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला कमी करण्याचे पाप करत आहे. अधिकारी यांनी मोजणी केल्यानंतर देखील अनेक जाचक अटी ते लावीत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जवळपास सात ते आठ वेळेस या परिसरातील बाधित कुटुंबांच्या मोजण्या झालेल्या आहेत. रस्त्याच्या कामासंदर्भात बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला जमिनीवर असलेले झाडे व इमारती पूर्ण द्यायचा असतो. मात्र मोजणी अधिकाऱ्यांकडून इमारत या कामात बाधित झाली असताना देखील केवळ इमारतीचा एक भागच बाधित दाखवला जाऊ जातो हे मात्र दुर्दैवी आहे.

इमारतीची पुढची बाजू तोडल्यानंतर त्या इमारतीला काहीच महत्त्व राहत नाही. व शासनाच्या धोरणाप्रमाणे बाधित इमारतीचा एक भाग जरी अधिग्रहित झाला तर संपूर्ण इमारत बाधित धरली जाते. मात्र झगडे फाटा परिसरातील शेतकऱ्यांच्या बाबतीत दुसरा नियम अधिकाऱ्यांकडून लावला जातो का असा सवाल देखील केशवराव होन यांनी उपस्थित केला. चांदेकसारे सरपंच किरण होन यांनी देखील बाधित संपूर्ण इमारती व जमिनी मोबदला मिळावा म्हणून मागणी केली आहे.
या परिसरात सध्या पाच ते सहा लाख रुपये प्रति गुंठा भाव आहे. परिसरातील अनेक गरजू कुटुंबातील नागरिकांनी एकत्र येत जागा खरेदी करून त्यावर घरे बांधलेले आहेत. मात्र आता जाचक मोजणीमुळे व अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या संदर्भात शेतकरी व बाधित झालेल्या कुटुंबांना एकत्र घेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असुन जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत या महामार्गाचे काम होऊ देणार नाही असा इशारा केशवराव होन यांनी दिला आहे.