देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
राहुरी शहरातील काॅलेज रोड परिसरात असलेल्या एकनाथ नगर येथील एका अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट अज्ञात भामट्यांनी आज दि. ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास फोडून घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेली. भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी शहरातील काॅलेज रोड परिसरात एकनाथ नगर येथील राम लक्ष्मी अपार्टमेंट येथे दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सागर वसंत वने हे राहत आहेत. तसेच तिसऱ्या मजल्यावर कानिफनाथ पाटीलबा बनकर हे राहतात. वने व बनकर हे दोन्ही कुटुंब आज दि. ६ मार्च २०२५ रोजी सकाळी त्यांच्या घराला कुलुप लावुन कामानिमित्त बाहेर गेले होते. वने हे दुपारी दिड वाजे दरम्यान घरी आले.

या दरम्यान अज्ञात भामट्यांनी सागर वने यांच्या घराचा कडी कोंडा कटरच्या सहाय्याने तोडुन आत प्रवेश केला. आणि घरातील सामानाची उचकापाचक करुन सुमारे अडीच ते तीन तोळे सोन्याचे दागीने व सुमारे चार लाख रुपए रोख रक्कम चोरुन नेली. त्यानंतर भामट्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कानिफनाथ बनकर यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र बनकर यांच्या घरात भामट्यांना काहीच सापडले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, हवालदार सुरज गायकवाड, नदिम शेख, विकास साळवे, अंकुश भोसले, जयदिप बडे, सतीष कुऱ्हाडे तसेच अहिल्यानगर येथील श्वान पथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाने भामट्यांचा माघ घेण्याचा प्रयत्न केला असता श्वान जागेवरच घुटमळले. त्यामुळे श्वान पथकाकडून कोणतीच माहिती मिळाली नाही. मात्र ठसे तज्ञांनी ठसे मिळवीण्याचा प्रयत्न केला.
गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारच्या दरम्यान झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात कोठेही सीसीटिव्ही कॅमेरे नसल्यामुळे तपास कामी अडचण निर्माण झाली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.