मोबाईलच्या दुनियेत भरकटली तरुणाई 

0

हा लेख लिहिण्याचा उद्देश खरंतर तरुणाईला जाग करणे आणि त्यांच्या मनामनात विचारांचा प्रवाह पोहोचवणे असा असला तरी तरुणाईने सदय परिस्थितीत मात्र कानामध्ये हेडफोन आणि डोळ्यांमध्ये स्क्रीन बसवलेली आहे. अशा तरुणांपर्यंत हे विचार पोहोचणार तरी कसे? हा खरा प्रश्न . असो तरीही विचारांचा पूल बांधूया आणि नव्या पिढीला नव्या मार्गाने नेऊया.

    मोबाईल म्हणजे आत्ता सर्वांचा ‘आत्मा’ झाला आहे. तो विसरला किंवा आऊट ऑफ रेंज गेला तर जणू संकट रुपी वादळ आपल्यावर आले ,अशा पद्धतीने सर्वजण वागू लागतात. यात मनाची घालमेल होते. चिंता, अस्वस्थता आणि आता कसे होणार आपले? ‘ साऱ्या जगाचा संपर्क तुटला’ अशा घोर निराशेने माणूस वागू लागतो.

 हाताला काम नसलेली मंडळी खास करून तरुण कॉलेजात, कॅन्टीनवर ,बाकड्यावर ,पारावर एकांत जागेत, माळावर कोठेही निर्भीडपणे कितीही वेळ बसू शकतात ती फक्त आणि फक्त मोबाईल मुळे कारण हा मोबाईल फक्त एकांत दूर करत नाही तर तो इतरांचे आयुष्य आपल्याला दाखवतो. त्यामुळे इतरांच्या आयुष्याचा घटक आपण बनतो.

 

रेल्समधील विनोद, दुःख, कथा या सर्व आपल्याशा वाटतात. त्यातली पात्र जणू ‘आपल्या आयुष्यातीलच’ बनून जातात .ही तरुणाई इतरांच आयुष्य बघण्यात इतकी मग्न झाली आहे की आता आपणही आयुष्य जगायला पाहिजे हेच विसरली आहे.

 दिवसाचा डेटा संपवणे ही एक गरज आणि कर्तव्य झाले आहे. 60 सेकंदाचे चटपटीत रिल्स आणि व्हिडिओ आसे अभ्यासाची कार्यक्षमता कमी करणारे अनेक घटक या मोबाईल मध्ये आहेत. एकाग्रता नष्ट होऊन काहीतरी करण्याची जिद्दच हा मोबाईल घेऊन जातो आहे. ‘आपण काही न का करिना पण इतरांनी केलेले पाहुया’ या उत्सुकतेने पोर नी पोरी तास न तास वाया घालवतात. त्यामुळे खेळ, आरोग्य, पैसा ,वेळ स्वास्थ्य, महत्त्वाची कामे या सर्वांची वाट लागते. 

मुले ,मुली सर्वच जण एकमेकांच्या शेजारी बसतात पण सारे लक्ष या मोबाईल मध्ये असल्यामुळे कोणीच कोणाशी बोलत नाही.

व्हाट्सअप च्या दुनियेतील येणारे सर्व मेसेज हे सत्यता न पडताच खरे मानले जातात. त्याशिवाय वेगवेगळ्या जातीचे धर्माचे स्वतंत्रपणे केलेले ग्रुप हे देखील विद्यार्थ्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम करण्यासाठी कित्येगदा प्रभावीपणे वापरले जातात. कोणत्याही मेसेज ची सत्यता पुस्तक आणि संदर्भ साहित्यातून तपासणे गरजेचे असते पण सतत स्क्रीन पुढे बसल्याने डोळ्यांना पुस्तके वाचण्याची इच्छाच होत नाही. त्याचबरोबर बोलण्याची शक्ती कमी होऊन, आपले विचार व्यक्त न झाल्याने नैराश्य येऊ लागले आहे.

 केवळ एकच मिनिटाचे रिल्स पाहता पाहता किती तास होतात हे कळत नाही .जंगली रमी पे चलो म्हणणारे ,आपल्याला अकाउंट खाली कसे करायचे हेच तर शिकवतात .त्यात आणखीन अनेक गेमची भर पडली आहे. शिवाय शरीराची भूक भागवायला सुद्धा मोबाईल कमी पडत नाही. त्यातली ‘अश्लीलता’ गुन्हेगार तर घडवत नाही ना ?हाही विचार करायला लावणारा विषय. 

   आता सांगा मोबाईल हे एक व्यसन तर नाही ना ?हे व्यसन दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक मार्गदर्शन शिबिरे घ्यावी लागतील असे वाटू लागले आहे .

फ्री कॉल मुळे नातेसंबंध सुधारणे ऐवजी बिघडू लागलेले दिसतात. कारण घरातला एकनएक प्रसंग रंगवून, रंगवून सांगितला जातो. त्यामुळे चर्चा होतात आणि बारीक सारी गोष्टीवरून दोन कुटुंबात वाद होतात. मिनिटा मिनिटा चे अपडेट दिले जातात. त्यामुळे खाजगी आयुष्य खाजगी राहतच नाही .

तरुणांना नोकरी शोधण्यासाठी मोबाईल वापरण्याची गरज कमी वाटते तर त्या विरुद्ध नोकरी मिळालेल्यांना शुभेच्छा देण्यात ते वेळ वाया घालवतात. हुशार मुलांना नोकरी लागेल ही पण कमी हुशार किंवा ज्यांना कष्ट करूनच नोकरी मिळवावी लागणार आहे अशा तरुणांना या मोबाईलच्या व्यसनामुळे अभ्यासा पासून, त्यांच्या जिद्दीपासून, त्यांच्या आत्मविश्वासापासून आणि त्यांच्या काहीतरी करण्याच्या प्रेरणे पासून प्रवृत्त करण्याचे काम हा मोबाईल करत आहे. मोबाईल चा वापर करूच नका असे मत अजिबात नाही, पण त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करणे गरजेचे आहे. पालकांचे नियंत्रण आणि लहान मुलांनी किती मोबाईल पहावा बरं? हा एक संशोधनाचा विषय.

 तरुणांनो अशा एक ना अनेक तोट्यांना आपण जाणता. आता उपाय आपल्याला शोधायचा आहे. तो आहे “निश्चयाचा “होय मनाचा ताबा हे उत्तम औषध. आपले ‘ध्येय’ ठरवा .मोबाईल पहायला उभे आयुष्य पडले आहे, असे मनाला पक्के सांगा! हे व्यसन आहे असे माना. मोबाईलवर जाणारा वेळ नक्की मोजा .आज आपण काय केले? हा प्रश्न मनाला विचारा. यातून काय साध्य होते ? यासंबंधी निक्षून मनाला बजावा .मोठ्यांचे ऐका, कारण त्यांची बरोबरी करण्याएवढे आपण अजून मोठे नाही याची जाणीव ठेवा .मित्राच्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा .आपला फायदा पहा .या समस्येचा उपाय स्वतः शोधा .एखादी आलेली समस्या ही या मोबाईल मुळे तर नाही ना? याचे विश्लेषण करा. फक्त आणि फक्त ज्ञानासाठी संधी म्हणून आणि शिकण्यासाठी मी मोबाईल वापरेल असे जर मनाने ठरवले तर उद्याचा दिवस तुझा असणार आहे. तरुणाई चे सळसळते रक्त ,उत्साह कोणी रोखू शकत नाही ,हा मोबाईल सुद्धा नाही पण त्यासाठी स्वतः निर्णय घ्यावा लागेल चला तर मग मनाशी खुणगाट बांधूया आणि मोबाईलचा फक्त आणि फक्त कामापुरता योग्य उपयोग करूया

उपक्रमशील शिक्षिका सौ.शुभागी बोबडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here