देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे अज्ञात भामट्याने सुनिल काळे यांचे जनरल स्टोअर दुकान फोडून दुकानातील सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. ३० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
सुनिल अशोक काळे, वय २८ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे राहत असून तेथे त्यांचे विलास जनरल स्टोअर्स या नावाने दुकान आहे. सुनिल काळे हे दि. २९ मार्च रोजी रात्री ८.४५ वाजे दरम्यान नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर ते दि. ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
भामट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानावरील पत्रा उचकटुन आत प्रवेश केला. आणि दुकानातील सामानाची उचकापाचक केली. तसेच दुकानातील काही मोबाईल व इतर सामान असा एकूण सुमारे ५० हजार रुपए किंमतीचा मुददेमाल चोरुन नेला.
सुनिल अशोक काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा रजि. नं. ३७८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.