देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्या जवळून बहिणी बरोबर दुकानात जात असताना पाय घसरून पडल्याने सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
राहुरी तालुक्यातील नांदूर जवळ असलेल्या भोकरवाडी लगत असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या कालव्या जवळून आपल्या मोठ्या बहिणी बरोबर दुकानात खाऊ आणण्यासाठी जात असताना रस्त्याने पळत असल्याने पाटाच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने जय नवनाथ पवार वय वर्ष सहा या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जय नवनाथ पवार हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आहे. जय पवार या बालकाचे आई-वडील मोजून मजुरी करून आपला प्रपंच चालवितात. जय पवार हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.व त्याला दोन बहिणी आहेत. जय पवार पाण्यात पडल्यानंतर त्याच्या मोठ्या बहिणीने मोठा आरडा ओरडा केला त्यावेळी आजूबाजूचे नागरिक धावून आले . यावेळी सुधाकर पवार या तरुणाने पाण्यात उडी घेऊन वाहून जाणाऱ्या जय पवारला बाहेर काढले. त्यानंतर त्याला ताबडतोब राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जय पवारला तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. सदरच्या घटनेमुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.