IPL 2025 PBKS vs KKR Preity Zinta happiness after Punjab Beat Kolkata by defending lowest total in IPL history win Actress Hugs this man on ground

0


IPL 2025 PBKS vs KKR Preity Zinta Happiness Video Goes Viral:  क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणतात. जिंकणारा संघ पराभूत होतो आणि पराभूत होईल असा वाटणारा संघ क्षणार्धात सामना फिरवू शकतो. याचाच प्रत्यय मंगळवारी इंडियन प्रिमिअर लीगच्या 31 व्या सामन्यात आला. पंजाब किंग्जच्या संघाने अवघ्या 111 धावा करुन गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा 16 धावांनी पराभव केला. कोलकात्याच्या संघाला 112 धावाही करता आल्या नाहीत.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकात्याचा संघ अवघ्या 95 धावांवर तंबूत परतला. एका क्षणी हा सामना हातातून गेला असं वाटत असतानाच पंजाबच्या गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. हातातून गेलेला सामना संघाने जिंकून दिल्यानंतर संघ मालकीण प्रिती झिंटा तर जागेवरच उड्या मारत सेलीब्रेशन करु लागली. अगदी दम लागेपर्यंत प्रितीने उड्या मारल्याची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली.

वीर विरुद्ध झारा सामन्याची चर्चा

कोलकात्याच्या संघाचा मालक शाहरुख खान आहे तर पंजाबच्या संघाची सहमालकीण प्रिती झिंटा आहे. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासूनच हा वीर आणि झारामधील सामना असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. हा सामना पाहण्यासाठी शाहरुख प्रत्यक्षात मैदानात उपस्थित नव्हता. मात्र प्रिती ही आवर्जून सर्व सामान्यांना हजेरी लावते तशी तिने या सामन्यालाही हजेरी लावली होती. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रियंश आर्य आणि सिमरन सिंगने हा निर्णय योग्य आहे असं दर्शवणारी कामगिरी करत संघाला 3.2 ओव्हरमध्ये 39 धावांची धडाकेबाज सुरुवात करुन दिली. मात्र पहिली विकेट पडल्यानंतर पंजाबच्या संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पंजाबचा संघ 16 व्या ओव्हरमध्येच 111 धावांवर तंबूत परतला. 

कोलकाता सहज जिंकणार असं वाटत होतं पण…

आता 120 चेंडूंमध्ये 112 धावा करायच्या म्हणजे कोलकाता सहज जिंकणार असं वाटत असतानाच कोलकात्याच्या संघाने आयती चालून आलेली संधी गमावली. कोलकात्याचा संपूर्ण संघ 16 व्या ओव्हरला 95 धावांमध्ये तंबूत परतला. अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी आणि आंद्रे रसेल या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. पंजाबच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत हा सामना कोलकात्याच्या हातून खेचून आणला. युजवेंद्र चहलने 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी चहलला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कारही प्रितीच्या हस्तेच प्रदान करण्यात आला.

प्रिती मैदानात आली अन्…

विशेष म्हणजे सामना संपल्यानंतर स्टॅण्डमध्ये उड्या मारत असणारी प्रिती खेळाडू मैदानामधून बाहेर पडत असतानाच मैदानावर पोहोचली आणि तिने थेट जाऊन चहलला मिठी मारही. प्रितीने चहलला हसत मिठी मारल्याचा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

चहलने चार विकेट्स, सामनावीर पुरस्काराबरोबरच प्रितीच्या मिठीच्या रुपात आयुष्यभर पुरणारी आठवण सोबत नेल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

पंजाबचा चौथा विजय

पंजाबाच्या संघाचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला आहे. मागच्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने विक्रमी 245 धावांचा पाठलाग करत पंजाबला पराभवाचा धक्का दिलेला. त्याचा वचपा आता पंजाबने कोलकात्याविरुद्ध काढला.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here