महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याला विरोध केला असून, खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. ज्यांना काही उद्योग नाही, काम नाही ते असले वाद घालतात आणि त्यातच वेळ घालवतात असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
“महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा वापरतात. काहीजण हिंदी राष्ट्रभाषा असल्याचं म्हणतात. पण त्यावरुन वाद असून, मला त्या वादात पडायचं नाही. ज्यांना काही उद्योग नाही, काम नाही ते असले वाद घालतात. आणि त्यातच वेळ घालवतात,” असं अजित पवार म्हणाले.
“इंग्रजी ही जगात बहुतेक अनेक देशात चालते. त्यामुळे ती भाषाही आली पाहिजे. तिन्ही भाषेला महत्त्व आहे. पण शेवटी आपली स्वत:च्या मातृभाषेला पहिल्या क्रमांकाचं स्थान आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अजित पवारांच्या या विधानावर मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी अजित पवारांना जर हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल तर त्यांनी पहिलीपासून धडे घेतले पाहिजेत. त्यांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे असा टोला लगावला.
दरम्यान राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘संघर्ष होईल आणि तोही टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल’ असं सांगत इशारा दिला आहे.
आता शासन काय निर्णय करतंय त्यावर पुढचं पाऊल येणाऱ्या काही दिवसात कळेल असंही संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. आज हिंदी भाषा सक्तीची करत आहात. उद्या बोलाल गुजराती भाषा शिका, परवा बोलाल तामिळ शिका, असं होत नाही, आम्ही आमच्या राज्याची भाषा शिकू. दुसऱ्या राज्याची भाषा आम्ही का शिकायची? हे बंधनकारक करण्याला आमचा विरोध असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.