[ad_1]
Kamal Haasan Divorce: सेलिब्रिटी जोडप्यांचा घटस्फोट होणं ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र अनेकदा सेलिब्रिटी विभक्त झाल्यानंतर त्यांच्या मुलांबद्दलही चर्चा होते. मात्र पालक विभक्त झाल्यानंतर त्यांच्या मुलांवर काय परिणाम होतो याबद्दल फारसं बोललं जात नाही. म्हणूनच यावर एका सेलिब्रिटी जोडप्याच्या मुलीने प्रकाश टाकला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री श्रृती हसनने आई-वडील विभक्त झाल्यानंतर आयुष्यात भरपूर मोठे बदल झाल्याचं म्हटलं आहे. एका मोठ्या कुटुंबात जन्माला आल्याचा काय फायदा होतो याबद्दल श्रृतीने यापूर्वी अनेकदा भाष्य केलं आहे. कलम हसन आणि सारिका यांची कन्या म्हणून श्रृतीला अनेक गोष्टी सहज मिळाल्या असल्या तरी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आई-वडील विभक्त झाल्यानंतर आयुष्य कशापद्धतीने लक्झरी गोष्टींवरुन सर्वसामान्यांशी संबंधित गोष्टींपर्यंत आलं याबद्दलचे अनुभव सांगितलेत.
अचानक झालेला बदल
“मी माझ्या पालकांचं विभक्त होणं हे फार नम्रपणे स्वीकारलं. आम्ही चेन्नईवरुन मुंबईमध्ये स्थायिक झालो तेव्हा तो सारा प्रकार म्हणजे एका महालातून दुसऱ्या महालात राहायला जाण्यासारखं नव्हतं. मुंबईत राहणं फारसं कन्फर्टेबल नव्हतं. मात्र या गोष्टी घडल्या यासाठी मी समाधानी आहे. मी सगळीकडे मर्सिडीजमध्ये फिरायचे आणि अचानक मला लोकल ट्रेनने प्रवास करावा लागला. हे फारच अचानक झालेला बदल होता. मात्र या दोन्ही प्रवासांमधून आपल्याला बरंच काही शिकता येईल हे मला जाणवलं,” असं श्रृतीने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
…म्हणून शिक्षणासाठी परदेशात गेले
चेन्नईमधून बाहेर पडल्यानंतर काही वर्षांनी श्रृतीने काही मोठे निर्णय घेतले. मी नंतर परदेशात संगीताचा अभ्यास करण्यासाठी गेले, असं श्रृतीने सांगितलं. आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं होतं. हाच उद्देश डोक्यात ठेऊन आपण परदेशी शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, असं श्रृतीने अधोरेखित केलं.
मी फार घाबरुन गेले होते
“मला वाटतं की मी आतून फार घाबरुन गेले होते. वर वर जरी मी फार आत्मविश्वास असलेली वाटत होते तरी काही वर्ष मी आतमधून फार हादरुन गेले होते,” असं श्रृतीने या मुलाखतीमध्ये प्रांजळपणे मान्य केलं. मी नम्र राहण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्यात झालेला बदल मला जाणवला, असंही श्रृतीने सांगितलं. “मी किती नम्र झाले आहे. मी किती चांगल्या मुलीसारखं वागते हे मला जाणवलं आणि त्यामधून मला अधिक आत्मविश्वास वाटू लागला,” असं श्रृतीने सांगितलं.
श्रृतीने अभिनयानबरोबरच संगीत क्षेत्रातील कामाचीही छाप सोडली आहे.
[ad_2]