[ad_1]
येथील गणूर चौफुलीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप चांदवड-मनमाड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजूरांना व दुचाकींना धडकून उलटली. या अपघातात तिघे मजूर गंभीर जखमी झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी पिकअपखाली दबल्या गेल्या.
.
बुधवारी (दि. २३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चांदवडकडून मनमाड बाजूकडे जात असलेल्या लसूनचे बॉक्स भरलेल्या पिकअपच्या (एमएच १५ जेडब्ल्यू ०७९४) चालकाचे येथील शासकीय विश्रामगृहाजवळील गणूर चौफुलीजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती चांदवड-मनमाड राज्यमार्गालगत उभ्या असलेल्या मजूरांना व रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकींवर धडकून गॅरेजसमोर उलटली. या अपघातात शिवदयाल महतो, अजय छोटेलाल पंडित, राम उदय महतो हे तिघे मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात पिकअपखाली दबल्या गेल्याने दुचाकींचे तसेच पिकअपमधील लसूणाच्या मालासह पिकअपचे मोठे नुकसान झाले. याबाबत मदन रामलखन गुफा (मूळ रा. बिहार, हल्ली रा. वरचेगाव, चांदवड) यांनी चांदवड पोलीसांत फिर्याद दिल्याने पोलीसांनी पिकअपचालक दत्तू भालेराव (रा. घोटी ता. इगतपुरी) यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
गतिरोधकाची मागणी गणूर चौफुलीवर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव निघून जातात. त्यामुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.
[ad_2]