शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा कमी काळात मिळवून देतो असे आमिष दाखवून खोटी आश्वासने, भूलथापा व आमिषे देऊन एका तरुणाची व त्याच्या सोबतचे महिलेची १५ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
.
याबाबत सईद हमीद शेख (वय-३६, रा. मंगळवार पेठ,पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २४/११/२०२३ ते १२/५/२०२४ यादरम्यान घडला आहे परंतु याबाबत उशिराने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहे. आरोपींनी तक्रारदार यांना त्यांचा शेअर ट्रेडिंग त्याचबरोबर आयपीएल सट्टा, रेसकार्सचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यात करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो असे अमिष दाखवले. सुरुवातीला दोन लाख रुपयांची गुंतवणूक करायला सांगून गुंतवणुकीवर ३२ लाख रुपये इतका नफा मिळवून देवू अशी खोटी आश्वासने, भूलथापा दिल्या. त्यानंतर पुन्हा सहा लाख इतकी गुंतवणूक ऑनलाईन व रोख स्वरुपात घेतली.
आरोपी पल्लवी गोसावी यांनी तक्रारदार यांच्याकडून पुन्हा ११ लाख ८० हजार रुपये घेून एकूण १९ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणूक घेतली. परंतु त्याबदल्यात केवळ सहा लाख रुपये परत करुन उर्वरित १३ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आरोपी अर्शद शेख याने तो पल्लवी गोसावी सोबत कामात पार्टनर असल्याचे सांगितले. तुमचे काम प्रोसेस मध्ये आहे तुम्हाला थोडया दिवसाने पैसे मिळतील असे सांगितले. तर आरोपी प्रसाद कांबळे याने वेळोवेळी समक्ष भेटून स्वत: तक्रारदार यांचे पैसे परत देण्यास जबाबदार असल्याचे देखील सांगितले. तसेच तक्रारदार यांचे सोबतची महिला फरहाना हरिष पटेल (वय- ३२,रा. मंगळवार पेठ,पुणे) यांचे देखील एकूण दोन लाख ४० हजार रुपये आरोपींनी घेऊन सदर रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत समर्थ पोलिस पुढील तपास करत आहे.