[ad_1]
मुलीच्या पाठवणीनंतर काही तासांतच वधूपित्यावर काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. सुख आणि दुःख यांच्या विचित्र संगमाची गोष्ट विषद करणाऱ्या या घटनेवर पंचक्रोशीत हळहळ केली जात आहे.
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमाता नगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. प्रकाशसिंह भिकूसिंह ताटू (60) असे मृत वधूपित्याचे नाव आहे. ताटू यांची मुलगी दीपाली हीचा मंगळवारी मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. पण ज्या अंगणात दीपाली बोहल्यावर चढली, त्याच अंगणातून तिच्या लाडक्या पित्याची गुरुवारी अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी दारात पडलेला लग्नाचा मांडव तसाच उभा होता.
लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना करावी लागली अंत्यसंस्काराची तयारी
पाहुणे, मित्र मंडळी आदल्या दिवशीच लग्नघरी दाखल झाले होते. प्रकाशसिंह लग्नाच्या निमित्ताने हातात पडेल ते काम करत होते. अंगणात लग्नाचा मांडव पडला होता. मुलीला हळद लागली होती. मंगळवारी सायंकाळी घरासमोरील मोकळ्या मैदानात दीपालीचे लग्न झाले. दीपाली ही प्रकाशसिंह यांची लाडाची लेक होती. त्यामुळे ते तिच्या हळदीत व लग्नात मनसोक्त नाचले. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या.
त्यानंतर बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास दीपालीची पाठवणी झाली. त्यानंतर प्रकाशसिंह आपल्या घराच्या गच्चीवर जाऊन झोपले. त्यानंतर ते उठलेच नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे झोपेतच मृत्यू झाला आणि क्षणार्धात घरातील आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ आली. ताटू यांना 5 मुली व 1 मुलगा आहे. दीपाली ही त्यांची चौथ्या क्रमांकाची मुलगी होती.
भावाने वडिलांच्या मृत्यूची गोष्ट कळू न देता बहिणीला घरी आणले
लग्न लागल्यानंतर दीपालीची बुधवारी पहाटे पाठवणी करण्यात आली. त्यानंतर लगेचच प्रकाशसिंह यांचे झोपेत निधन झाले. त्यामुळे आताच नांदण्यासाठी गेलेल्या दीपालीला ही गोष्ट कशी सांगायची? असा प्रश्न कुटुंबीयांपुढे उभा राहिला. विशेष म्हणजे तिचा भाऊ पाठवणीसोबत तिच्यासोबत गेला होता. त्याला ही बातमी समजली. त्यानंतर त्याने मोठ्या धिराने आपल्या बहिणीला काहीही न कळू देता तिला माहेरी आपल्या घरी आणले. पण घरी आल्यानंतर वडिलांचा मृतदेह पाहून दीपालीने दारातच हंबरडा फोडला. ते पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतहून अश्रू ओघळू लागले.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुलीच्या लग्नाचा सोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचा क्षण असतो. हसतमुखांनी स्वागतलेली पाहुणे, रंगीबेरंगी सजावट, आणि वधूच्या चेहऱ्यावरचा आनंद यांनी वातावरण भारलेले असते. पण प्रकाशसिंह यांच्या मृत्यूमुळे आनंदाच्या या सोहळ्याचे काही तासांतच अकल्पनीय शोकांतिकेत रुपांतर झाले. या प्रसंगामुळे जीवनातील सर्वात सुंदर क्षण आणि असह्य वेदना एकाच वेळी समोर आल्या. तसेच मानवी जिवनाची अनिश्चिततेची जाणिवही सर्वांना झाली.
[ad_2]