Digital payments banned at petrol pumps in Nagpur, focus on cash transactions from May 10 due to cyber fraud | नागपुरात पेट्रोलपंपांवर डिजिटल पेमेंट बंद: सायबर फसवणुकीमुळे 10 मेपासून रोख व्यवहारांवर भर – Nagpur News

0



नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर शनिवार 10 मेपासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट (फोनपे, गुगल पे, पेटीएम, डेबिट/क्रेडिट कार्ड) स्वीकारले जाणार नाही, असा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला आहे.

.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.कोव्हिडनंतर देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे.

काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. जर या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे, असे यावेळी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जैस्वाल यांनी सांगितले.संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. परिणामी, इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून, व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

पंपचालकांच्या म्हणण्यानुसार, दररोज हजारो डिजिटल व्यवहार होतात. ग्राहक कोणत्या खात्यातून पैसे पाठवत आहेत, त्याचा इतिहास काय आहे, याची माहिती घेणे पंपचालकांच्या आवाक्या बाहेरचे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची पडताळणी करणे अशक्य आहे.

ग्राहकांची गैरसोय होणार असल्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, खात्यातील रक्कम गोठवल्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे. हा निर्णय टाळणे शक्य नाही, असे अमित गुप्ता, मुस्तफा हस्सनजी, नरेंद्र मुळे, अभिजित भगत आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.विदर्भ पेट्रो डिलर असोसिएशनने डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे. डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here