[ad_1]
तुमसर तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या तुमसर पंचायत समितीतील दस्तऐवज खोलीला शनिवारी (ता.26)सकाळी 8 वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 1965 पासून जमा केलेले सर्व दस्तऐवज, संगणकीय उपकरणे,
.
आग लागली त्यावेळी पंचायत समिती कार्यालयाला चौथा शनिवार असल्यामुळे सुट्टी होती आणि त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली. मात्र, आगीच्या धुराने संपूर्ण इमारत व्यापली होती. माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धावले. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दमदार प्रयत्नांनंतर काही तासांत आग नियंत्रणात आणण्यात आली, पण तोपर्यंत दस्तऐवज खोलीतील सर्व कागदपत्रे आणि उपकरणे पूर्णतः जळून खाक झाली होती.
सदर दस्तऐवज खोली पंचायत समितीच्या नवीन इमारतीत असून, या खोलीत 1965 पासूनचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र, विविध प्रकरणांचे रेकॉर्ड्स, प्रशासकीय फाईली सांभाळून ठेवण्यात आले होते. एका कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार, खोलीत दरवाजे आणि खिडक्या पूर्ण बंद असतानाही पंखे सुरू होते. पंख्यांच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर आग खरंच अपघात होती का? की ती हेतुपुरस्सर लावण्यात आली? यासंदर्भात पंचायत समितीच्या आवारात विविध चर्चा सुरु आहेत. कारण या आगीत अनेक शासकीय उपक्रम, तपासणीतील प्रकरणे, सरपंच, सचिव, तसेच काही अधिकाऱ्यांविरोधातील चौकशीची कागदपत्रे जळून गेल्याने अनेक संशयाला वाव मिळतोय.
या आगीत भ्रष्टाचाराची पातळी, कारभारातील अपारदर्शकता आणि दोषारोपाच्या मालिका देखील खाक झाल्याचे बोलले जात असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दस्तऐवज संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेमुळे ‘डिजिटल इंडिया’सारख्या मोहिमेवरही प्रश्नचिन्ह उभं राहतंय, कारण अनेक वर्षांच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत तयार करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं या आगीत दिसून आलं.
या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, आग लागण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट होईपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत.
[ad_2]