शिर्डी, दि.४ मे : ऊर्ध्व प्रवरा (निळवंडे २) प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामधून पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत असून, संगमनेर व राहूरी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीकरिता पुरेसे पाणी मिळेल याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालव्यात अनधिकृतपणे पाइप टाकून पाण्याचा उपसा करू नये, असे आवाहन उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार, निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यातून २० एप्रिलपासून लाभक्षेत्रात पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचे नियोजन करताना बंधारे, के.टी. विअर व पाझर तलाव भरून प्रत्येक शेतकऱ्याला समान पाणी मिळावे, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.
प्रथम टप्प्यात राहूरी तालुक्यातील गावांना १७ मे २०२५ पर्यंत आवर्तन देण्यात येणार असून, त्यानंतर १८ मे पासून संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी देण्यात येणार आहे ; मात्र १ मे रोजी संगमनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यात नियोजनाविना पाइप टाकल्याने राहुरी तालुक्यात जाणारे पाणी अडथळले गेले. त्यामुळे प्रशासनास पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे.
संगमनेर व राहुरी तालुक्यांतील शेतकऱ्यांना शेती आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळेल. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे आणि विभागाच्या नियोजनात अडथळा आणू नये, असे आवाहनही हापसे यांनी केले आहे.