Hingoli Government Hospital’s Thirst Is On Tanker | हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयाची तहान टँकरवर: पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णांचे हाल, वॉटर कुलर बनले शोभेच्या वस्तू – Hingoli News

0

[ad_1]

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयाची तहान टँकरवर भागवली जात असून रुग्णालयात पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र तसेच पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने पाणी पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली

.

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हिंगोलीसह सेनगाव, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी दररोज किमान ६०० ते ७०० रुग्ण तपासणीसाठी येत असून सुमारे २०० पेक्षा अधिक रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्यावे लागत आहे. मात्र रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे या ठिकाणी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले वॉटर कुलर शोभेच्या वस्तू बनले आहेत.

दरम्यान, रुग्णालयातील पाच वॉर्डमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णालायाच्या छतावर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. या शिवाय पाणी साठवणीसाठी टँक देखील तयार करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी पाणीच उपलब्ध नाही. रुग्णालयास पालिका प्रशासनाकडून नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र अनेक वेळा नळ योजनेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने रुग्णांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.

हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गांगडलवाडी शिवारात फुटल्यामुळे मागील दोन दिवसांपासून पाणी नाही. त्याचा परिणाम रुग्णालयाच्या पाणी पुरवठ्यावरही झाला असून सध्या या ठिकाणी टँकरने पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे दररोज दिड लाख लिटर पाणी आवश्‍यक असतांना केवळ २५ हजार लिटर पाणी आणून रुग्णांची कशीबशी तहान भागवली जात आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणी करण्याची मागणी केली जात आहे.

रुग्णकल्याण समितीच्या बैठकीत मुद्दा मांडणार : निनाजी कांडेलकर

रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत मांडणार आहे. रुग्णालयासाठी नगरपालिकेने चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच रुग्णालय प्रशासनाने विंधन विहीर घेऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून घेण्याची मागणी करणार असल्याचे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य निनाजी कांडेलकर यांनी म्हटले आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here