हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर येहळेगाव सोळंके शिवारात दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार, तर तीघे जण जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. ५ सायंकाळी घडली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील महेश अशोक काकडे (३६) व दिलीप शामराव मोरे हे दोघेजण त्यांच्या दुचाकी वाहनावर आज दुपारच्या सुमारास औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होते. यावेळी डिग्रस कऱ्हाळे येथील सौर उर्जा प्रकल्पाचे काम करणारे ओमप्रकाश सोपान लकडे (रा. डिग्रस कऱ्हाळे ) व शामराव भगवान सामाले (रा. पाथरी, जि. परभणी) हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर औंढा नागनाथकडे जात होते.
हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर येहळेगाव सोळंके शिवारात त्यांच्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील चौघेही गंभीर जखमी झाले. दोघांच्याही दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडल्या तर चौघेही रस्त्यावरच कोसळले.
या अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौघांनाही रुग्णवाहिकेद्वारे हिेंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र महेश काकडे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या अपघातातील जखमी ओमप्रकाश लकडे, शामराव सामाले, दिलीप मोरे यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
दरम्यान, मयत महेश काकडे हा हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत प्रमुख पदावर कार्यरत होता. अत्यंत मनमिळावू व रुग्णांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख होती. या घटनेमुळे नर्सी नामदेव गावावर शोककळा पसरली आहे मयत महेश याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असल्याचे सुत्रांनी सांगितले.