[ad_1]
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप व विरोधी बाकावरील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप-काँग्रेसची जातगणनेवर दुटप्पी भूमिका आहे. मुळात हे दोन्ही पक्ष जातीवादी व आरक्षणविरोधी असल्य
.
प्रकाश आंबेडकर गुरुवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष जातीनिहाय जनगणनेवर आपला दावा करत आहेत. पण त्यांचा राजकीय इतिहास जातीनिहाय जनगणना, आरक्षण व आंबेडकरी चळवळीविरोधातील भूमिकेमुळे रंगलेला आहे. कदाचित दलित, आदिवासी व ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणनेविरुद्ध या दोन्ही पक्षांना आपल्या कारस्थानाचा विसर पडला असेल. काही हरकत नाही, मी पुन्हा त्यांना त्याची आठवण करून देतो.
अडवाणींच्या रथयात्रेवर टीका
जेव्हा माझे मित्र तथा माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी आणि सरकारी नोकऱ्या व शिक्षणात ओबीसींसाठी 27% आरक्षण लागू केले तेव्हा भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही त्याचा तीव्र विरोध केला. या निर्णयाविरोधात कठोर भूमिका घेतली. 1990 मध्ये, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संघाच्या पाठिंब्याने मंडल आंदोलन मोडून काढण्यासाठी हिंदुत्वाच्या कमंडलाचे राजकारण सुरू केले. अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेची घोषणा केली. या यात्रेमुळे मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण झाला आणि बाबरी मशीद पाडण्यात आली.
राजीव गांधींनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली होती
दुसरीकडे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लोकसभेत मंडल आयोगाच्या अहवालावरील चर्चेत अत्यंत जातीयवादी भूमिका घेतली होती. त्यात त्यांनी ओबीसींना 27% आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला होता. 6 सप्टेंबर 1990 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणात राजीव गांधी म्हणाले होते, “आपण वेगळ्या इलेक्टोरेटसाठी गोलमेज परिषदेकडे परत जात आहोत का? जे आपल्या देशाचे तुकडे करण्यासाठी रचले गेले होते.”
राजीव गांधींनी केवळ ओबीसींच्या आरक्षणालाच विरोध केला नाही, तर त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत दलित वर्गासाठी (अनुसूचित जाती) केलेल्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा उल्लेख करत त्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी बाबासाहेबांची वेगळ्या मतदार संघाची मागणी देशाचे विभाजन करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर त्याचा ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात उदाहरण म्हणून वापर केला.
आम्ही महाराष्ट्रात मंडल आंदोलन उभे केले
हा भाजप व काँग्रेसचा खरा चेहरा आहे. हे दोन्ही पक्ष जातीयवादी व आरक्षणविरोधी आहेत. त्या काळी मी माझे मित्र – व्ही. पी. सिंह, लंकेश्वर गुरुजी, शांताराम पंदेरे, मखाराम पवार, दशरथ भांडे, चंदन तेलंग, प्रा. सुभाष पटनाईक, मंगलाताई खिंवसरा, हरिभाऊ शिकलगार – यांच्यासमवेत महाराष्ट्रात मंडल आंदोलन उभे करण्यासाठी काम करत होतो. उत्तर भारत व देशाच्या अन्य भागातील आरक्षणवादीही हे काम करत होते. पण भाजप व काँग्रेस त्याचा विरोध करत होते. ही या दोन्ही पक्षांनी स्वीकारलेल्या आरक्षणविरोधी भूमिकेची केवळ एक छोटीसी झलक होती.
आता आपण भाजप व काँग्रेसने अलीकडच्या काही घटनांवर स्वीकारलेल्या भूमिकांवर नजर टाकू. 2021 व 2023 मध्ये संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आगामी जनगणनेत जातीचा समावेश करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते. केंद्राने 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, जातीनिहाय जनगणना “1951 पासून धोरणात्मक बाब म्हणून सोडून देण्यात आली आहे.”
काँग्रेसने जातगणना केली, पण डेटा जाहीर केली नाही
दुसरीकडे, प्रत्येक वेळी जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात जातीनिहाय जनगणनेचा विचार फेटाळून लावला होता. सरकारने म्हटले होते की, “जनगणना ही जातीची माहिती गोळा करण्यासाठीचे एक आदर्श साधन नाही.” आरक्षणवाद्यांच्या दबावानंतर, काँग्रेसला 2011 मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना करावी लागली, परंतु काँग्रेसने कधीही डेटा सार्वजनिक केला नाही.
भाजप आणि काँग्रेसला फक्त दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची मते हवी आहेत. या पक्षांचा सामाजिक न्याय, आरक्षण आणि बाबासाहेबांशी काहीही संबंध नाही. ज्याप्रमाणे सरडा शिकार करताना आपला रंग बदलतो, त्याचप्रमाणे भाजप आणि काँग्रेसने तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी आपले रंग बदलले आहेत. त्यांनी आंबेडकरवाद्यांच्या जातीविरोधी आंदोलनांतून नारे व अजेंडे चोरले.
अनेक दशकांपर्यंत दलित, आदिवासी व ओबीसींच्या मागण्या नाकारल्यानंतर आता भाजप व काँग्रेस आमच्या पूर्वजांच्या, आई-वडिलांच्या रक्त, कष्ट व त्यागातून उभारलेले आंदोलन आपले असल्याचा दावा करून त्यांच्या यशाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच भाजप व काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
[ad_2]